केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथील रेणुकानगर भागात गेली एक महिना महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे जळालेले विद्युत रोहित्र न बसविल्यामुळे पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
ज्या ठिकाणी रोहित्र बसविले होते त्या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्याला रस्त्याची अडचण भासू लागल्याने ५०० फूट पूर्वेकडे शेतीच्या बांधावर रोहित्र बसविण्यास मंजुरी देण्यात आली होती. जागा बदलल्याने विद्युत रोहित्र बसविण्यासाठी तयार करण्यात आलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप शेतकरी विजय शिवरकर यांनी केला आहे. पोल स्ट्रक्चरचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले. विद्युत रोहित्रचे स्ट्रक्चर एका बाजूला कललेले होते. त्यामुळे विद्युत रोहित्र बसविण्यास तब्बल एक महिना विलंब झाला आणि पर्यायाने पिकांना पाणी देता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहेत. दरम्यान, महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे नुकसान झाले असून त्याची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
दरम्यान, संबंधित ठेकेदार संजय खळदकर यांच्याशी शेतकरी सुभाष बोत्रे यांनी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. यावेळी पारगाव महावितरणचे उपअभियंता पप्पू पिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराला सांगून पोल स्ट्रक्चर पुन्हा उभारले असून, विद्युत रोहित्रासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. लवकरच त्या ठिकाणी विद्युत रोहित्र बसवले जाईल.
१८ केडगाव पारगाव
पारगाव येथे जळालेले विद्युत रोहित्र दाखवताना शेतकरी.