देऊळगावराजे : पेडगाव (ता. दौंड) परिसरातील हातातोंडाशी आलेली पिके सुकली आहेत. परिणामी, परिसरातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील पिके वाचवण्याकरिता तसेच जनावरांना पाणी मिळावे, याकरिता कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे. तालुक्याचा पूर्व भागातील शेतकरी पूर्ण उजनीच्या फुगवट्यावर अवलंबून आहेत. परंतु, गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही; त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच पाणी आटले. म्हणून पूर्व भागातील पाण्याची दुष्काळी स्थिती पाहून २८ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले. पंरतु, २६ दिवस होऊनही पूर्व भागात पाणी पोहोचले नाही. ९०० क्युसेक्सने पाणी सोडण्याऐवजी दोन हजार क्युसेक्सने सोडले असते, तर १० ते १२ दिवसांत पाणी खानोट्यापर्यंत पोहोचले असते. परंतु, पाटबंधारेच्या ढिसाळ कारभारामुळे व पाण्याचे व्यवस्थित नियोजन न केल्याने येथील शेतकऱ्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही बंधाऱ्यांवरील स्थानिक शेतकरी ढापे काढू देत नाहीत. तरी वरील सर्व बंधाऱ्यांचे ढापे काढण्यासाठी आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त पाटबंधारे विभागाने घेऊन ढापे काढले, तरच पूर्व भागात पाणी पोहोचेल. पाणी पोहोचेपर्यंत वीज बंद ठेवण्याचे आदेश देऊनही वीज बंद केली नाही; त्यामुळे येणारे जे पाणी आहे त्यावर अलबून असणारे कंपन्या, कारखाने, विद्युत मोटारी खेचून घेतात. पाणी येण्यास खूप विलंब होणार आहे.
पाण्याअभावी पिके सुकली
By admin | Published: April 23, 2016 12:48 AM