पुणे: तब्बल दोन ते तीन आठवड्यांच्या खंडानंतर राज्यात गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने खरिपातील बहुतांश पिकांना जीवनदान मिळाले आहे. हा पाऊस केवळ भीज स्वरूपाचा असल्याने पिकांना जरी दिलासा मिळाला असला तरी धरणांच्या पाणीसाठ्यात कोणतीही वाढ होणार नाही अशीच चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणखीन जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे राज्यात पेरण्यांना उशीर झाला. मात्र, त्यानंतर जुलैत झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्या मार्गी लागल्या पाऊस उशिरा दाखल झाल्यामुळे उडीद मुगासारखी कडधान्याची पिके शेतकऱ्यांना करता आली नाहीत. जुलैनंतर साधारण महिनाभर राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण व पूर्व विदर्बातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता अन्यत्र पावसाची स्थिती जेमतेमच होती. मात्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून १८ ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली. तर १३ जिल्ह्यांतील ५३ मंडळांमध्ये पावसाचा खंड हा २२ ते २५ दिवस इतका होता. त्याचा थेट परिणाम पिकांच्या विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, भात, मका यासारख्या महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस जोरदार झाला नसला तरी हलक्या स्वरूपाचा पाऊस अनेक दिवस सुरू होता. त्यामुळे पिकांमध्ये आंतरमशागत करता येत नव्हती. शेतांत तण माजल्याने शेतकऱ्यांना ज्यादा पैसे देऊन मजुरांना बोलवावे लागत होते. त्यामुळे अशा ठिकाणी पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांना आंतरमशागतीची कामे करता आली.
नागपूर विभागात चांगला पाऊस
राज्यात एक ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत ७८ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या २७.३ टक्के पाऊस झाला आहे. नागपूर विभागात १७४ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला आहे. राज्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. अमरावती विभागात ६१.५ मिलिमीटर (२६.५ टक्के) संभाजीनगर ३५ मिलिमीटर (१८.२ टक्के) पुणे विभागात ५१.३ मिलिमीटर (२०.७ टक्के), नाशिक विभागात ३५.२ मिलिमीटर (१७.८ टक्के) तर कोकण विभागात १८८.२ मिलिमीटर (२४.६ टक्के) पाऊस झाला आहे.
''या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. आणखी १५ दिवसांनी असाच पाऊस झाल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. - विनय आवटे, सहसंचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे''