पुणे : पीएमपी प्रशासनाकडून ई-बस खरेदीसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये प्रचंड अनियमित झाली आहे. पहिल्याच टप्प्यासाठी २५ मिनी ई-बस खरेदी करण्यात येणार असून, त्यात तब्बल २० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला आहे.
पीएमपीच्या ताफ्यात ५०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्यात १५० बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. यामध्ये ९ मीटरच्या २५ आणि १२ मीटरच्या १२५ बसचा समावेश आहे. यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून सुमारे २० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप तुपे यांनी केला आहे.
स्मार्ट सिटीच्या बैठकीमध्ये पीएमपीसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या बसची ९० दिवसांची चाचणी घेण्याचा निर्णय झाला होता. ज्या कंपन्या या निविदा प्रक्रियेसाठी इच्छुक आहेत, त्यांच्या बसची चाचणी शहरात होणार होती. पीएमपी प्रशासनाने एकाच कंपनीच्या बसची चाचणी घेतली आहे. मुळात सर्व निविदा प्रक्रियाच संशयास्पद आहे. इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी पीएमपी प्रशासनाने जी निविदा प्रक्रिया राबवली, तीमध्ये निविदेचा कालावधी संपण्याअगोदरच तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. शेवटीची मुदतवाढ १९ आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबरदरम्यान देण्यात आली होती. निविदा प्रक्रिया २५ आॅक्टोबरला पूर्ण होणार त्याच वेळी वेबसाईट बंद पडली. चढ्या दराने निविदा भरण्यात आल्या असून त्यामध्ये भाजपाच्या बड्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.