पुरंदर उपसा जलसिंचन योजनेत कोटींचा भ्रष्टाचार - संजय जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 11:48 PM2019-02-06T23:48:30+5:302019-02-06T23:48:51+5:30
पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासून शेतकरी पैसे जमा करून पाण्यासाठी भरतात; मात्र आजतागायत पावती दिली जात नाही. किती पाणी सोडतो, याचा नेमका हिशेब नाही.
भुलेश्वर - पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासून शेतकरी पैसे जमा करून पाण्यासाठी भरतात; मात्र आजतागायत पावती दिली जात नाही. किती पाणी सोडतो, याचा नेमका हिशेब नाही. योजना सरकार बनवते, चालवते; मग एवढा पैसा लागतो कशाला. माहिती व्यवस्थित मिळत नाही. पैसे भरूनही पाणी मिळत नाही. पैसा जातो कोठे, यामुळे पुरंदर उपसा योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे मत काँग्रेसचेपुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी मांडले. ते पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे झालेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ‘चलो पंचायत अभियाना’दरम्यान बोलत होते .
ते पुढे म्हणाले की, सत्तेत असून व जलसंपदा व जलसंधारण विभागाचे मंत्री असूनदेखील आपल्या लोकप्रतिनिधींना पुरंदरच्या पठारावर गुंजवनीचे पाणी आणता आले नाही. बंद पडलेली पारगाव-माळशिरस नळपाणी पुरवठा प्रादेशिक योजनासुद्धा सुरू करता आली नाही. ती योजना काँग्रेस व मित्रपक्षांमुळे सुरू होत आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे प्रभारी मनीष चौधरी व महासचिव गणेश जगताप, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सोनाली यादव, सुनीता कोलते, पुरंदर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पोमण, नीरा मार्केट कमिटीचे नंदकुमार जगताप, मारुती पाटोळे, समीर मुळीक, नीलेश जाधव, अनिल जाधव, माजी सरपंच एकनाथ यादव,शांताराम यादव,माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके, विकास इंदलकर,दिलीप मोरे, रफिक शेख, वैशाली बोरावके, ग्रामपंचायत सदस्या पुष्पा ताम्हाणे, संदीप यादव,नीलेश गाडेकर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन जयेश गद्रे, प्रास्ताविक माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके, तर आभार पुणे जिल्हा गटसचिव संघटनेचे सचिव रफिक शेख यांनी मानले.
शक्ती अॅप वापरा
नुकत्याच परराज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तरुणांनी आपल्या भागातील अडचणी, तसेच आपला उमेदवार कोण असावा, हे कळविल्यामुळे तेथील अडचणी दूर झाल्या व योग्य उमेदवार दिल्यामुळे सत्तांतर झाले, महाराष्ट्रातदेखील बदल घडविण्यासाठी प्रत्येक तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये शक्ती अॅप वापरण्याचे आवाहन केले.