लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चांदीच्या वस्तू, एक महिन्याचा किराणा, पंधरा लिटर तेलाचे डबे, साड्यासह थेट मताला हजारो रुपयांचे वाटप करत पैशांचा अक्षरश : धुराळा उडवला. यात शिरुर, हवेली, खेड आणि मावळ, मुळशी तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रातील व मोठ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा निवडणूक खर्च कोटींच्या घरात गेला आहे.
जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार (दि.15) रोजी मतदान झाले. यात राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्य संख्येनुसार 15 हजार ते 75 हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे. परंतु आयोगाने दिलेल्या खर्चाच्या मर्यादा जिल्ह्यातील बहुतेक सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ओलांडली आहे. हवेली , खेड, शिरूर आणि मावळ, मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवारांचा खर्च तर एक ते पाच कोटींच्या घरात गेला आहे. खेड तालुक्यातील एका ग्रामपंचायत उमेदवाराने आपले निवडणूक चिन्ह असलेल्या बॅटच्या चांदीच्या प्रतिकृतीचे वाटप केले. जुन्नर तालुक्यात काही सदस्यांनी एक महिन्याचा किराणा, पाच लिटर व 15 लिटर तेलाचे डबे, तर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर साड्या, विविध प्रकारची वाणांचे मोठ्याप्रमाणात वाटप करण्यात आले. निवडणुका जाहीर झाल्या पासून उमेदवारांकडून मोठ्याप्रमाणात मिष्टान्न व मासहार जेवणाच्या रोज पंगती उठवल्या जात होत्या.
तर मतदानाच्या बहुतेक सर्व मोठ्या व चुरशीच्या ग्रामपंचायतीत अनेक सदस्यांनी थेट मतदारांना पैसे वाटप करण्यात आले. या एका मतासाठी पाचशे रुपयांपासून एक, दोन, तीन हजारसह थेट 20, 25 हजार रुपयांचे देखील वाटप करण्यात आल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. तसेच मुंबई, पुण्यातील मतदारांना गावाला घेऊन येणे आणि पुन्हा सोडण्यासाठी देखील विशेष सोय करण्यात आल्या होत्या.
------
पुण्यासाठी 12 तर मुंबईसाठी 20 गाड्या
जुन्नर तालुक्यातील एक ग्रामपंचायतीमधील उमेदवारांनी पुण्यातील आपले हक्काचे मतदारांना मतदानाला गावाला घेऊन येणे व पुन्हा सोडविण्यासाठी खास बंदोबस्त केला होता. यासाठी पुण्यासाठी 12 गाड्या तर मुंबईसाठी 20 गाड्यांची सोय करण्यात आली होती.
------
शिरूरमध्ये मताला 80 हजार
शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी हद्दीतील एका ग्रामपंचायती उमेदवारांने तब्बल 80 हजार वाटप केल्याची जोरदार चर्चा गावांच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर एमआयडीसीतील एकाही ग्रामपंचायतीत मताला 20-25 हजारापर्यंत देखील वाटप झाल्याचे खात्रीच्या सुत्रांनी दिली.