पिंपरी : विषयपत्रिकेवरील ६६ विषयांसह ऐनवेळचे तब्बल १०० विषय घुसवून सुमारे शंभर कोटींपेक्षा जास्त खर्चाचे विषय स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आले. इतरवेळी अवघ्या काही मिनिटांत उरकणारी सभा शुक्रवारी तब्बल रात्री साडेदहापर्यंत सुरु होती. कधी नव्हे ती शुक्रवारी एवढ्या उशीरपर्यंत नेमकी कोणत्या विषयांवर ‘खल’ सुरु होता, याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. स्थायी समितीतील सोळा सदस्यांपैकी आठ सदस्यांचा कालावधी संपल्याने ते सदस्य निवृत्त होणार आहेत. शुक्रवारी या सदस्यांची अखेरची सभा होती. विषयपत्रिकेवरील वेळेप्रमाणे ११ वाजता सभेला सुरुवात झाली. मात्र, काही वेळातच सभा तहकूब करण्यात आली. त्यानंंतर पाचच्या सुमारास पुन्हा सभा सुरु झाली. दरम्यान, अधिकाधिक खर्चाचे ऐनवेळचे विषय आणण्यासाठी सदस्यांची धडपड सुरु झाली. विविध विभागात जावून विषय आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. (प्रतिनिधी)मंजुरीचा सपाटा : कोट्यवधींची कामेमहापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीने मागील दोन आठवड्यातही उड्डाणपूल आणि रस्ते यांच्या माध्यमातून तब्बल १८० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली. स्थायीने जाता-जाता कोट्यवधींची उड्डाणे घेतली आहे. यामध्ये मोठ्या खर्चाच्या विषय मंजुरीचा सपाटा सुरु होता. काही क्षणातच कोट्यवधीची कामे मंजूर झाली.सभेसाठी विभागप्रमुख सभागृहात बसले होते. तर काही सदस्य पहिल्या, दुसरया मजल्यावर घिरट्या घालीत होते. त्यामुळे सभा नक्की सुरु आहे की नाही हेच लवकर कळत नव्हते. सदस्य वारंवार आत-बाहेर करीत होते. तर अधिकारी कंटाळल्याचे दिसत होते. ऐनवेळचे विषय कसे घुसडता येतील, यासाठी धावपळ सुरु होती. कोटीची उड्डाणे घेण्याच्या तयारीत असलेले काही सदस्य मोठ्या खर्चाचे विषय आल्याखेरीज सभागृहात बसण्यासदेखील तयार नव्हते. दरम्यान, विषयपत्रिकेवरील ६६ विषयांसह ऐनवेळचे तब्बल १०० विषय दाखल झाले. अन् अर्ध्या तासातच शंभर कोटींपेक्षा अधिक खर्चाचे विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये थेरगावात उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयासाठी येणारया ४८ कोटींच्या खर्चाचा समावेश आहे. महापालिका भवनात दिवसभर चाललेल्या या धावपळीची जोरदार चर्चा होती.
शंभर विषयांतून कोटीची उड्डाणे
By admin | Published: February 28, 2016 3:47 AM