जेजुरी - जेजुरी नगरपालिकेने शासनाकडून आलेल्या विविध योजनांसाठी अनुदान व विशेष निधी न वापरल्याने सुमारे २ कोटी ३७ लाख ९७ हजार ७०२ रुपये माघारी गेले. पुरंदर तालुका भाजपच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रतीक झगडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.सन २०१३ ते २०१८ पर्यंत शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य उपयोग न केल्याने जेजुरीच्या विकासाला कात्री लागली. गेली पाच वर्षे नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता असून पालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिक व भाविक विकासापासून वंचित राहिल्याचा आरोप झगडे यांनी केला. पुरंदर भाजपाचे तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांनी पालिकेच्या या चुकीच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी भाजपाचे जेजुरी शहराध्यक्ष अशोक खोमणे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अलका शिंदे, किसान मोर्चाचे सचिन पेशवे, गणेश भोसले, प्रसाद अत्रे उपस्थित होते.पालकमंत्री गिरीश बापट यांनी नियोजन मंडळाच्या माध्यमातून ४५ लाख, तर हुतात्मा हरी मकाजी नाईक यांचे स्मारक दुरुस्तीसाठी १० लाख ७० हजार रुपये दिले. ग्रामीण रुग्णालयासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा निधी दिल्याची माहिती या वेळी देण्यात आली. पालिकेचा जो निधी माघारी गेला त्यामध्ये शासनाने २०१३ मध्ये ५ कोटी विशेष निधी म्हणून दिले होते. त्यापैकी १ कोटी ४४ लाख रुपये निधी वापराविना पडून राहिले.२०१४ पर्यंत राज्यातील ज्या पालिकांनी विकास निधी खर्च केला नाही तो अखर्चित निधी शासनाकडे जमा करायचा असल्याचे सांगितले. पालिकेवर २०१७ मध्ये काँग्रेसची सत्ता आली. या काळात आलेल्या निधीचा नागरिकांच्या हितासाठी, विकासकामांसाठी वापर केला जाणार आहे. तो परत जाणार नाही. उलट २०१४-१५ चा अखर्चित निधी जरी शासनजमा होणार असला तरी त्यापैकी १ कोटी ५८ लाख रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी घेतली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरी घेण्यात येणार असल्याचे सोनवणे म्हणाल्या. गेल्या वर्षभरात बाजारतळ, पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, नवीन शॉपिंग सेंटर आदी कोट्यवधी रुपयांचे विकासकामांचे प्रस्ताव शासनदरबारी पाठविले आहे.- वीणा सोनवणे, नगराध्यक्षा, जेजुरी नगरपालिका
कोट्यवधीचा निधी गेला परत, जेजुरी नगरपालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 3:14 AM