श्रीकिशन काळेपुणे : पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ या तालुक्यांतील बांबू तोड व विक्रीतून दरवर्षी सुमारे १५० कोटी रुपये या भागातील शेतकऱ्यांना मिळत आहेत. तसेच तोड करणारे मजूर आणि वाहतूक करणाऱ्यांना देखील रोजगार मिळत आहे, अशी माहिती बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक डॉ. हेमंत बेडेकर यांनी दिली. बांबू फक्त कापून विकण्याऐवजी त्यापासून विविध वस्तू, हस्तकलेतून वापर वाढविला तर कोट्यवधींची उलाढाल वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच यंदा दोनशे हेक्टर जिल्ह्यात नवीन लागवड झाली आहे.
वन सर्वेक्षणातील अंदाजानुसार सह्याद्रीच्या दोन्ही उतारावरील ८,९ जिल्ह्यात महाराष्ट्राला सुमारे ९०० कोटींचे उत्पन्न मिळते. हे गेली अनेक वर्षे चालू आहे. हे उत्पन्न बांबू तोडून विकण्याने मिळते. याच बांबूचा जर व्यापारी उपयोग केला गेला किंवा काही प्रक्रिया केली गेली, तर हेच उत्पन्न काही हजार कोटींच्या घरात जाईल. दुर्दैवाने याकडे अजून कोणी पाहिले नाही. कोल्हापूर, सांगली, लोणंद, सासवड, पुणे या बाजारात अनेक दशके बांबूचा व्यवहार चालू आहे.राज्यात वाया गेलेल्या जमिनीवर बांबू लावला तर चांगले उत्पन्न होईल. काही शेतकरी एकत्र येऊन बांबूची शेती करून बायो-सीएनजी प्रकल्प टाकू शकतात. याला चांगली मागणी आहे, असे बेडेकर म्हणाले. बांबू लावल्यावर तीन-चार वर्षानंतर कायमस्वरूपी उत्पन्न मिळायला सुरवात होते. डोंगर उतारावर, माळरानावर लावता येते.
--------------------------...तर राज्यात ५ हजार कोटींपर्यंत उलाढाल बांबूची पीक म्हणून लागवड, निगा व नियोजन केल्यास राज्यातील बांबू व्यापार सुमारे ५००० कोटींपर्यंत जाऊ शकतो. बांबूचे मार्केटिंग व्हायला हवे. तर यापासून चांगला कोळसा, दैनंदिन उपयोगातील ताट-वाटी, चमचे होऊ शकतात. प्लास्टिक ऐवजी हे वापरू शकतो. बांबूच्या वस्तूंचे लगेच विघटन होते. हाँटेलमध्ये पार्सलसाठी बांबूच्या बाँक्सचा वापर झाला पाहिजे.
------------------------------
नदी प्रदूषणावरही बांबू उपयुक्तकुरकुंभ, शिरवळ, जेजुरी या व इतर ठिकाणी एमआयडीसी आहेत. त्यातील प्रदूषित पाणी थेट नदीत जाते. तेच पाणी एका ठिकाणी जमा करून तिथे बांबू लावला तर त्यातील प्रदूषित घटक बांबू शोषून घेईल आणि पाणी शुद्ध होईल. ते शुद्ध पाणी जमिनीत मुरल्यावर विहिरांना पाणी राहिल. असा उपक्रम राज्यभर व्हायला हवा, असे बेडेकर यांनी सांगितले.
-------------------------------