पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणाची आयोगामार्फत सध्या चौकशी सुरू असून, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी (दि. १६) पुन्हा उलटतपासणी होणार आहे. सुनावणीवेळी ते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. या प्रकरणात आणखी काहींची उलटतपासणी घेण्यात येणार असल्याचे कळते.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी दंगल झाली होती. त्यासंदर्भात कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि सदस्य निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात शनिवारी प्रकाश आंबेडकर यांच्या उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता आहे, असे त्यांचे वकील ॲड. किरण कदम यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरव राव यांची शुक्रवारी उलटतपासणी झाली. ॲड. रोहन जमादार यांनीही उलटतपासणी घेतली. त्यात राव यांनी दंगल झाल्यानंतर मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रात कोरेगाव भीमाच्या इतिहासाबाबत चुकीचा उल्लेख केला होता. मात्र, त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याबाबतचा खरा इतिहास मांडला आहे. तसेच, ऐतिहासिक स्तंभाबाबत महसूल खात्याकडे काही पुरावे आहेत. त्या पुराव्यांच्या आधारे स्तंभाची जागा ही लष्कराची असल्याचा उल्लेख असल्याबाबत जमादार यांनी राव यांची उलटतपासणी घेतली. आयोगासमोर रमेश गलांडे, सहायक पोलिस निरीक्षक महेश चव्हाण आदींची उलटतपासणी होणार आहे, असेही सांगण्यात आले.