सोमेश्वरनगर : श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे शेवटच्या आणि चौथ्या श्रावणी सोमवारी हर हर महादेवाच्या जयघोषात सुमारे २ लाख भाविकांनी स्वयंभू लिंगाचे दर्शन घेतले. रात्री बारा वाजता बारामतीचे ज्येष्ठ नागरिक हनुमंत भंडलकर व त्यांच्या पत्नी नर्मदा शेंडकर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तर करंजेपूलचे उपसरपंच कुणाल गायकवाड व त्यांच्या पत्नी शीतल गायकवाड या उभयतांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या वेळी बारामती तालुका राष्ट्रवादी युवकचे अमित कंधारे, अॅड. जयवंत मोकाशी, मधुकर सोरटे, देवस्थानचे अध्यक्ष रामदास भांडवलकर, करंजेचे सरपंच प्रकाश मोकाशी, सचिव हेमंत भांडवलकर, खजिनदार योगेश मोकाशी विश्वस्त मोहन भांडवलकर, अनंत मोकाशी व सुधीर भांडवलकर आदी होते. सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, बाबासाहेब फरांदे, दादा शिंदे, जगन्नाथ मगर या भाविकांच्या वतीने मंदिरात भाविकांसाठी खिचडीची सोय करण्यात आली होती, तर सोमेश्वर कारखान्याचे संचालक नामदेव शिंगटे व शांताराम होहकर यांनी भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली होती. रात्री बारापासूनच भाविकांची मंदिराकडे ये-जा सुरू झाली होती. पहाटे तीननंतर गर्दी वाढू लागली. बारा वाजता पालखी सोहळा मोठया दिमाखात पार पडला. विशाल गायकवाड, सुखदेव शिंदे, संतोष गायकवाड, विजय सोरटे, अप्पासाहेब गायकवाड यांच्या हस्ते पालखीची महापूजा करण्यात आली. जळगाव सुपे व कोऱ्हाळे येथील खोमणे यांची पालखी भेट पार पडली. यामध्ये शेला पागोट्याचा मान देण्यात आला. या वेळी तानाजी खोमणे, गोरख खोमणे यांच्यासह कोऱ्हाळे व जळगाव येथील असंख्य खोमणेबांधव उपस्थित होते.
श्रीक्षेत्र सोमेश्वर येथे २ लाख भाविकांची गर्दी
By admin | Published: August 30, 2016 1:44 AM