--
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत आहे. उपलब्ध साठ्यापेक्षा येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त होत असल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. लसींचा होणारा तुटवडा व त्यामुळे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आरोग्य केंद्रावरील गर्दीने कोरोनाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होण्याच्या घटनांमध्येदेखील वाढ होत आहे.
शासनाच्या माध्यमातून गर्दीचे ठिकाण टाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र लसीकरणाच्या ठिकाणीच गर्दी होत असेल तर दोष कोणाला देणार? त्यामुळे शासनाच्या माध्यमातून लसींच्या उपलब्ध साठ्यांमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे.
कुरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत ग्रामीण भागातील जवळपास नऊ गावे येत असल्याने व वाहतुकीच्या दृष्टीने कुरकुंभ केंद्र सोयीस्कर असल्याने इतर ठिकाणाहून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे देखील कुरकुंभ केंद्राची निवड करण्यास प्राधान्य मिळत असल्याने या केंद्रावर लसीकरणासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात.
त्यामुळे अनेकदा स्थानिकांच्या लसीकरणाचा प्रश्न देखील उपस्थित होत राहिला आहे. मात्र लसीकरणासाठी शक्य तितकी सोयीस्कर यंत्रणा निर्माण करण्याचे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत केले जात आहे. उपलब्ध सर्व लसींचा उपयोग पद्धतशीरपणे केला जात असल्याने नागरिकांना याचा फायदा होत आहे.
दरम्यान ग्रामीण भागातील अनेक गावातून स्थानिकांना लस उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून गावातील ठिकाणी उपक्रम आयोजीत केली जात आहे. त्यामुळे देखील यंत्रणेवरील ताण बराच निवळत आहे. नुकतेच ग्रामपंचायत पांढरेवाडी येथे अशा उपक्रमातून स्थानिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर कुरकुंभमध्ये देखील लवकरच अशा उपक्रमातून स्थानिकांना लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन वैद्यकीय अधिकारी उत्तम कांबळे यांनी दिले आहे. त्यामुळे कुरकुंभ येथील स्थानिकांचा रोष कमी होण्यास मदत होणार आहे.