पुणे : सलग चौदा वर्षे देणे समाजाचे उपक्रम राबविणे हे काम सोपे नाही. वीणा गोखले यांचे कार्य लघुपटाद्वारे जगभर पोहोचावे ही कल्पना खूप चांगली आहे. लघुपटाचे २५ टक्के काम झाले असून, लघुपट विविध भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे. त्यासाठी समाजाकडून निधी संकलित करून त्याद्वारे आवश्यक खर्च करण्यात येणार आहे. अनेकांना चांगल्या कामासाठी पैसे देण्याची इच्छा असते. पण, कोणाला द्यावेत हे समजत नाही. अशा दानशूर व्यक्तींनी या लघुपटासाठी अर्थसाहय करावे असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. 'देणे समाजाचे' उपक्रमाद्वारे वंचित घटकांसाठी कार्यरत १६५ संस्थांना गेल्या १४ वर्षांत समाजाकडून साडेचार कोटी रुपयांचे अर्थसाहय मिळवून देणा-या 'आर्टिस्ट्री' संस्थेच्या वीणा गोखले यांचे कार्य लघुपटाद्वारे जगभरात पाहोचणार आहे. लोकांकडून संकलित केलेल्या पैशांतून (क्राऊड फंडिंग) हा लघुपट निर्मित होत आहे. गेल्या वर्षी देणे समाजाचे प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी मांडण्यात आलेला हा विचार गोखले यांनी उचलून धरला. ३० मिनिटे कालावधीच्या या लघुपटाच्या चित्रीकरणासाठी होणा-या खचार्ची जबाबदारी घेतली असून, ते या लघुपटाचे सदिच्छा दूत (ब्रँड अँबेसिडर) आहेत, अशी माहिती लघुपटाची निर्मिती करणा-या कम्युनिकेशन सपोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप दीक्षित यांनी शनिवारी दिली. गोखले म्हणाले, वंचितांना मदत मिळावी यासाठी समाजाकडून पैसे संकलित करण्याचे वीणा गोखले यांचे कार्य प्रशंसनीय आहे. वैयक्तिक आयुष्यातील संकटांना धीराने सामोरे जात सलग १४ वर्षे देणे समाजाचे उपक्रम राबविणे हे काम सोपे नाही. दानशूर व्यक्तींनी या लघुपटासाठी अर्थसाहय करावे.दीक्षित यांनी 'क्राऊड फंडिंग'द्वारे मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपावर आधारित लघुपटाची निर्मिती केली होती. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने हा लघुपट राष्ट्रीय अमूल्य जतन ठेवा (नॅशनल हेरिटेज) म्हणून नुकताच स्वीकारला आहे.
’देणे समाजाचे’ कार्य जगभरात पोहचण्याकरिता ‘क्राऊड फंडिंग’ उभारले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 4:01 PM
वीणा गोखले यांचे कार्य लघुपटाद्वारे जगभर पोहोचावे ही कल्पना खूप चांगली आहे...
ठळक मुद्देदानशूर व्यक्तींनी अर्थसहाय्य करण्याचे विक्रम गोखले यांचे आवाहन