पुणे: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन आज (दि. १९) सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.मात्र याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.खुद्द अजित पवारांनी देखील आपणच नियम करायचे आणि मोडायचे हे काही पटत नव्हते असे सांगतानाच तुम्ही नियमांचे पालन केले नाही अशी खंत व्यक्त केली. याच गर्दीला लक्ष करत आता भाजपने जोरदार टीका केली आहे.
याबाबत भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गोळा केलेली गर्दी ही पुणेकरांच्या संकटात भर टाकणारी आहे. तसेच या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियमांची पायमल्ली करत जगताप यांनी गोळा केलेली गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रित करणारी आणि पुणेकरांच्या जीवाशी खेळणारी आहे.एकीकडे शेकडो वर्षांची शिस्तबध्द परंपरा असणाऱ्या वारकरी संप्रदायाला पायी पालखीसाठी परवानगी नाकारणे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बेशिस्तीचे प्रदर्शन करणे बेजबादारपणाचे आहे. असे आयोजन टाळायला हवे होते. यांच्या चमकोगिरीमुळे खुद्द अजितदादांना दिलगिरी व्यक्त करावी लागली असेही मुळीक यांनी यावेळी म्हणाले.
कोरोनाचे संकट अद्याप टळलेलं नाही. प्रत्येक पुणेकर कोरोना विरोधात लढत असताना, पुणेकरांच्या जिवाशी खेळण्याचा बालिश प्रकार जगताप यांनी केला आहे. जगताप भानावर आले असतील तर त्यांनी पुणेकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील मुळीक यांनी यावेळी केली.
वाद नको,गटतट नको ; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला पक्षासाठी काम करताना वाद नको, गटतट नको, मतभेद नको. सर्वांचा मान ठेवा. पवार साहेब तसेच वागतात. आदराची वागणूक ज्येष्ठांना मिळेल याची काळजी घ्या.पुणे आणि पिंपरी चिंचवड ला पर्यटन साठी काय करता येईल यावर काम सुरू आहे. इथे रोजगार तयार व्हावा ही अपेक्षा आहे. कोणी काही टीका केली तर उत्तर द्यायच्या फंदात पडू नका. राज्याचे नेते बोलतील असे सांगा. हानी होईल असे वर्तन होणार नाही कार्यालयाची पायरी चढताना याची काळजी घ्या असा सल्ला अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.