- लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : भोसरीतील इंद्रायणीनगर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने बुधवारी दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघातस्थळी नेहमीप्रमाणे गर्दी जमली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने मदत मिळावी, यासाठी सोशल मीडियाचा उपयोग होणे अपेक्षित होते. मात्र, बघ्यांच्या गर्दीतील अनेकजण त्या तरुणाची तडफड आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करीत होते. माणुसकीला लाजिरवाणा हा प्रकार शहरात दुसऱ्यांदा अनुभवास आला आहे. गतवर्षी चिंचवडमध्ये ट्रान्सफॉर्मरखाली बसलेल्या गटई कामगाराचा अंगावर जळणारे तेल पडून मृत्यू झाला. त्या वेळी अशाच प्रकारे मोबाइलवर घटना टिपण्याचा प्रयत्न झाला होता, पण मदतीला कोणी धावून गेले नाही. इंद्रायणीनगर येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सतीश प्रभाकर मेटे (वय २५, रा. गंधर्वनगरी, मोशी) असे आहे. ज्या वाहनाने त्याला धडक दिली, त्या वाहनचालकाने तेथून पळ काढला. अपघातस्थळी अनेकांनी धाव घेतली. सतीश मूळचा औरंगाबादचा होता. पिंपरीतील एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून तो काम करीत होता. सतीशला उचलून तातडीने मिळेल त्या वाहनाने रुग्णालयात हलविणे महत्त्वाचे होते. अथवा त्याच्यासाठी रुग्णवाहिका मागविण्याच्या हालचाली होणे गरजेचे होते. मदतीसाठी हालचाल होण्याऐवजी जखमी सतीशची तडफड मोबाइल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी जो तो सरकत होता. सतीशच्या छातीला जोरदार मार लागल्याने त्याला श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. गर्दी बघून या मार्गावरून जाणारे डॉ. कीर्तिराज काटे तेथे थांबले. विव्हळत पडलेल्या सतीशच्या मदतीला ते धावून आले. त्यांनी रिक्षा थांबवली. रिक्षातून वायसीएम रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेल्यानंतर सतीशचा मृत्यू झाला.
माणुसकी हरवलेल्या बघ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 4:22 AM