पुणे : तब्बल तीन महिन्यांनंतर शहरातील न्यायालयीन कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू झाले. त्यामुळे मंगळवारी (दि. १५) पहिल्याच दिवशी पक्षकार, पोलीस आणि वकील मंडळींची न्यायालयांमध्ये गर्दी झाली होती. सर्वांनी मास्क परिधान केले असले तरी सकाळच्या वेळेस फिजिकल डिस्टन्सिंगचे ‘तीन तेरा’ वाजल्याचे पाहायला मिळाले.
गतवर्षी पहिला लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जिल्हा न्यायालयासह इतर न्यायालयांत केवळ तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू होती. त्यामुळे न्यायालयात असलेली गर्दी ही मर्यादित होती. मात्र, मंगळवारी सर्वच प्रकारच्या दाव्यांवर सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वच दाव्यांना तारखा देण्यात आल्या होत्या. तारीख असलेल्या दाव्यांतील दोन्ही बाजूचे पक्षकार आणि वकील न्यायालयात हजर झाले होते. त्यासह इतर न्यायालयीन कामांसाठी न्यायालयात आलेल्या वकील व पक्षकारांची संख्या मोठी होती. जिल्हा न्यायालयात मंगळवारी मोठी गर्दी पाहायला मिळाली. न्यायालयाच्या गेटपासून अगदी कोर्ट हॉलपर्यंत वकील, पक्षकारांची गर्दी झाली होती. या सर्वांत फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळला गेला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
न्यायालयात आलेले पक्षकार नितीन पारेख म्हणाले, तब्बल तीन महिन्यांनतर माझ्या प्रकरणाच्या तारखेला मुहूर्त लागला आहे. मंगळवारी माझ्या प्रकरणावर युक्तिवाद झाला. आता प्रकरण काहीसे पुढे गेले आहे. लवकरच केस मार्गी लागेल अशी आशा करीत आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता सर्वच दाव्यांवर सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे मंगळवारी न्यायालयातील गर्दी वाढली होती. कोरोनाविषयक खबरदारी सर्वांनी घ्यावी. तसेच गरज असेल तरच न्यायालयात यावे, असे आवाहन आम्ही वकील आणि पक्षकारांना करीत आहोत- अॅड. वैशाली चांदणे, अध्यक्षा, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन
-------------------------------------