अतुल चिंचली -पुणे : गेल्या दोन दिवसांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एसटी स्थानकावरील प्रवाशांची गर्दी ओसरल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले.गेल्या दोन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोनवरून दहावर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिक महाराष्ट्रात सर्वत्र प्रवास करण्यासाठी एसटीचा वापर करतो. त्यामुळे याचा परिणाम सर्वप्रथम एसटीवर झाला आहे. एसटी स्थानकावर शनिवार आणि रविवार या दिवसाव्यतिरिक्त इतर दिवशी प्रवासी पाहायला मिळतात. पण या दोन-तीन दिवसांत मोकळ्या रस्त्यांप्रमाणे एसटी स्थानकेही मोकळी दिसू लागली आहेत. स्वारगेट आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे म्हणाल्या, फेब्रुवारीमध्ये प्रवाशांची संख्या व्यवस्थित होती. देशात कोरोनाचा रुग्ण आढळल्यावर नागरिकांनी धास्ती घेतली आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यावर प्रवासी संख्येत घट होण्यास सुरुवात झाली. दरवर्षी होळीला मोठ्या प्रमाणावर प्रवासी महाराष्ट्रात सर्वत्र जातात. पण यंदा होळीच्या दृष्टीने गाड्यांचे नियोजन करूनही मोजक्याच प्रवाशांनी एसटीने बाहेरगावी जाण्याचे ठरवले. कोकणात होळी मोठ्या प्रमाणावर साजरी होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी अधिक गाड्या असूनही त्या पूर्णपणे भरल्या नाहीत. ............आम्ही एसटी चालकाला गाडी भरून घेऊन जाण्याचे सांगत आहोत. सध्या तरी प्रवासी संख्येत घट झालेली नाही. किंवा उत्पन्नातही फरक जाणवत नाही. पण नागरिक मास्क लावणे, गर्दी न करणे, शांततेत प्रवास करणे अशा प्रकारची जबाबदारी घेताना दिसून येत आहेत. पुण्यात दोन-तीन दिवसांत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पुढील काही दिवसात प्रवासी संख्येत घट होण्याची शक्यता आहे. - जनार्दन लोंढे, शिवाजीनगर बस स्थानकप्रमुख...............मार्च महिन्यात कोल्हापूर तसेच अक्कलकोटला देवदर्शनासाठी जाण्याची योजना होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे प्रवास तसेच गर्दीची ठिकाणं टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे मी माझी योजना पुढे ढकलली आहे. कोरोनाचा प्रसार थांबवणे फक्त शासनाची जबाबदारी नाही, प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पातळीवर जबाबदारीने वागून या आपत्तीचा सामना केला पाहिजे.-विशाल दहीभाते, प्रवासी
मी एलआयसी एजंट आहे. आता मुंबईला चाललो आहे. कोरोनाचा धोका पुण्याप्रमाणे इतर ठिकाणी जाणवू लागला आहे. फक्त खेडेगावात कोरोना विषाणू आढळला असे मी अजून ऐकले नाही. त्यामुळे मला गावात जाऊन राहणे योग्य वाटते.-प्रदीप चोरगे, प्रवासी.............मला कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांत जावे लागते. एका कामानिमित्त हिंगोलीवरून आलो आहे.पण कोरोनामुळे काही दिवस पुढचा प्रवास करावा की नाही याबद्दल समजत नाही. कोरोना झपाट्याने पसरू शकतो, त्यामुळे सावधान राहणे गरजेचे आहे. इथल्याच नातेवाईकांकडे काही दिवस थांबून परिस्थिती नियंत्रणात आल्यावर परत गावी यावे, असे घरच्यांचे म्हणणे आहे.-निनाद सपकाळ, प्रवासी.