आज चतुर्थी निमित्ताने पहाटे पाच पाजता प्रक्षाळपूजा झाली तर सकाळी सात वाजता सालकरी ढेरे यांची प्रक्षाळपूजा झाली. चतुर्थीच्या निमित्ताने पेठेतील दुकाने हार, दुर्वा आणि श्रींच्या प्रतिमांनी सजली होती. सकाळी सात वाजता झालेल्या धूपारती पूजेच्या वेळेस गावातील भक्तांनी गर्दी केली होती. राज्य शासनाच्या सूचनेनुसार मयुरेश्वर मंदिर व भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. मात्र, चतुर्थीची वारी वाया जाऊ नये म्हणून मयुरेश्वर पायरी व शिखर दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती.
दुपारी १२ वाजता श्रींस नैवद्य दाखविण्यात आला. पितृपक्ष व आज भरणी श्राद्धामुळे लॉकडाऊन काळातील इतर चतुर्थीच्या मानाने गर्दी कमी प्रमाणात होती. आज सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, ठाणे, पिंपरी-चिंचवड आदी भागांतून भक्त कळस दर्शनासाठी आले होते. राज्यातील अनेक दुकाने, बस, रेल्वे मॉल सुरळीत सुरू झाली आहेत. त्यामुळे मंदिर सुरू करावीत, अशी मागणी येथील व्यापारी संघटना व येणाऱ्या भक्तांकडून होत आहे.
सायंकाळी परीसरातील भक्तांचा ओघ पुन्हा वाढला. चतुर्थी निमित्ताने एका भक्तांने मंदिराचा दर्शन गाभारा फुलांनी सजविला होता. रात्री चंद्रोदयाच्यावेळी ‘श्रीं’स महानैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी झालेल्या आरती प्रसंगी काही मोजके पुजारी मंडळी उपस्थित होते.