पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:29 AM2024-10-14T00:29:54+5:302024-10-14T00:31:14+5:30
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमधील तब्बल 10 विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. यात पुणे शहरातील शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि हडपसर या पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहर, पिपंरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील काँग्रेस इच्छुकांनी मुलाखतीच्यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी ४४, पिंपरी चिंचवडमधील तीन मतदारसंघासाठी २२ आणि जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघासाठी २५ अशा एकुण ९१ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कोथरूड विधानसभा मतदारसंघात एकच, तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १२ इच्छुक आहेत.
पुणे शहर, पिपंरी चिचंवड आणि पुणे जिल्हयातील २१ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतल्या. पिपंरी, भोसरी, चिचंवड या तीन विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखती झाल्या.
त्यानंतर पुणे जिल्ह्यातील आणि दुपारीनंतर पुणे शहरातील विधासभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. काँग्रेसभवन येथे इच्छुकांचे वाजत गाजत आणि समर्थक जोरदार घोषणा देत होते.
काँग्रेसभवनाच्या पहिल्या मजल्यावर मुलाखती घेण्यात आल्या. तेथे केवळ इच्छुकाला सोडण्यात येत होते. त्यामुळे समर्थक काँग्रेसभवनाबाहेर होते. त्यामुळे कॉग्रेस भवनचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. या मुलाखतींच्या आधारे राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि केंद्रातील नेते उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमधील तब्बल 10 विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. यात पुणे शहरातील शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि हडपसर या पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसने जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघाबरोबरच खेड, शिरूर आणि दौंड या मतदारसंघांवरही दावा केला आहे.
शिवाजीनगरमध्ये सर्वाधिक इच्छुक
पुणे शहारात काँग्रेसकडे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १२ इच्छुक आहेत. कोथरूडमध्ये १, वडगावशेरी ५, कसबा ६, पुणे कॅण्टोन्मेंट ११, पर्वती ३, हडपसर ३, खडकवासला विधानसभा मतदारसंघात कॉग्रेसकडुन ३ जण इच्छुक आहेत. पिपंरी विधानसभा मतदारसंघात १०, चिचंवड मध्ये ९, भोसरीमध्ये ३ जण इच्छुक आहेत. पुणे जिल्ह्यात मावळमध्ये सर्वाधिक म्हणजे १० जण इच्छुक आहेत. जुन्नर मध्ये २, आंबेगावमध्ये २, खेड आळंदीमध्ये ३, शिरूरमध्ये ३ , दौंड १, इंदापुर १, बारामती १, भोर १, पुरंदरविधानसभा मतदारसंघामध्ये १ जण इच्छुक आहेत.