आंबेगाव तालुक्यात दि.११ रोजी ७०, दि.१० रोजी १५५, दि.९ रोजी १५४, दि.८ रोजी १४१, दि.७ रोजी ९१ रूग्ण असे रूग्ण सापडत आहेत. या रुग्णांसाठी अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. दररोजची रूग्णसंख्या पाहता हे केंद्र पूर्ण भरले आहे.
तसेच मंचरमधील सरकारी दवाखाना रुग्णांनी भरला आहे, खाजगी दवाखान्यांमध्ये जागा नाही. इंजेक्शनसाठी लोक फिरत आहेत, अशी भयानक परिस्थिती तयार झाली आहे. यावर उपाययोजना मधून दोन दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. सर्व बाजारपेठा, व्यवहार बंद होते.
मात्र सोमवारी दिवस उजाडल्याबरोबर गर्दी वाढू लागली. बँकांच्या बाहेर रांगा लागल्या. बाजार, भाजीपाला घ्यायला गर्दी झाली. रस्त्यावर गाड्या पळत होत्या. पोलीस लोकांना सतत सूचना देत होते. पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या. मागील दोन दिवस बँका बंद होत्या. त्यात पुढे दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांच्या बाहेर जास्त गर्दी होती.
लॉकडाऊनचा शेतीवर मोठा परिणाम झाला. सध्या कांदाकाढणी सगळीकडे सुरू आहे, त्यात पावसाचे वातावरण असल्याने शेतकरी चिंतेत आहे. काढून ठेवलेला कांदा भिजला तर सडू लागेल व बाजारपेठेत कांदा पाठवायचा असेल तर गाड्या नाहीत, अशा परिस्थितीत कांदा शेतकऱ्यांनी दोन दिवस झाकून ठेवला. तसेच तरकारी माल लॉकडाऊनमुळे बाजारात पाठवता आला नाही. जर पुन्हा लॉकडाऊन झाले तर हा तरकारी माल पूर्ण खराब होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
घोडेगाव येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाहेर झालेली गर्दी.