पिंपरी : जमावबंदी कायद्यातील नियमांवर बोट ठेवत सर्वच दुकानांवर कारवाई केली जात आहे. एक टेबल असणारे दोनशे चौरस फूट दुकान आणि दोन हजार चौरस फुटांच्या दुकानालाही एकच न्याय लावला जात आहे. नियम सुस्पष्ट नसल्याने कारवाईचा बडगा उगारला जात आहे. नियमात स्पष्टता आणावी आणि टाळेबंदी करू नये, अशी भूमिका मिठाई विक्रेत्यांनी मांडली आहे.
संपूर्ण टाळेबंदी असल्याची समजूत झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मिठाई नाशवंत असल्याने ती फेकून देण्याची वेळ येते की काय, अशी धास्ती विक्रेत्यांमध्ये पसरली होती. गुढीपाडव्याला मिठाईच्या पदार्थांना मोठी मागणी असते. त्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. अशातच टाळेबंदी लागू झाल्याचा समज झाल्याने मिठाई विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मिठाई आणि बेकरीला त्यातून सूट दिली असल्याने विक्रेत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
——
शनिवार आणि रविवारी मिठाई दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. जमावबंदी कायद्यानुसार पाच जणांना एकत्र येता येत नाही. हा नियम खासगी दुकानांना सरसकट लावला जात आहे. एखादे दुकान दोन हजार चौरस फुटांचे असल्यास तेथे अनेक काउंटर असतात. अशा दुकानांना पाचचा नियम कसा लागू होईल.
- श्रीकृष्ण चितळे, कार्याध्यक्ष, मिठाई फरसाण असोसिएशन
——
टाळेबंदीसारखा निर्णय मिठाई उत्पादकांना परवडणारा नाही. खव्यासारखे पदार्थ टाकून द्यावे लागतील. दुकान भाडे, आचारी आणि कामगारांचे वेतन, वीज असे अनेक खर्च आहे. गुढीपाडवा तोंडावर आहे. आम्ही नियमांचे पालन करून ग्राहकांना दुकानात प्रवेश देतो. नोंदवही, तापमापकाद्वारे तपासणी करणे आणि एकाच वेळी दुकानात पाच जण उपस्थित असतील याची दक्षता घेतली जाते.
- सारंग अगरवाल, मिठाई व्यावसायिक, पीसीएमसी लिंक रोड