लोणावळा : शासकीय, निम शासकीय व बँक कर्मचा-यांना चौथा शनिवार, रविवार व रमजान ईद अशी सलग तीन दिवस सुटी मिळाली. त्यामुळे सर्व कर्मचा-यांनी वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले. त्यामुळे लोणावळ व पवन मावळातील पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी झालेली होती. दोन दिवसांपासून लोणावळा परिसरात झालेल्या दमदार पावसाने पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले लोणावळ्यातील भुशी धरण सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ‘ओव्हर फ्लो’ झाले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भुशी धरण लवकर ओव्हर फ्लो झाले आहे. ही बातमी व्हॉटस् अप व वेबसाईटच्या माध्यमातून वा-यासारखी पसरली. त्यात अनेकांना सुटी असल्याने संबंधितांनी आपला मोर्चा वर्षा सहलीकडे वळविला. सोमवारी ईदच्या दिवशीच धरण ओव्हर फ्लो झाल्याने शहरात मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना चांगलीच ट्रिट मिळाली आहे. पर्यटक पंढरी अशी ओळख असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर पाणी वाहू लागल्याने सकाळी पर्यटकांनी जल्लोष केला.गेल्या वर्षी भुशी धरण ३ जुलै रोजी ओव्हर फ्लो झाले होते. यंदा तो ८ दिवस आधीच ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांत लोणावळ्यात २०७ मिमी पाऊस झाला असून २६ जून २०१७ अखेर शहरात ५८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे परिसरातील वलवण, तुंगार्ली व लोणावळा धरणाची पातळीही वाढली आहे. शहरापेक्षा डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने शनिवारी अवघे ४० टक्के असलेले धरण सोमवारी ओव्हर फ्लो झाले. त्यानंतर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.
पर्यटकांच्या गर्दीने फुलला भुशी डॅम
By admin | Published: June 27, 2017 8:01 AM