लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : सलग सुट्यांमुळे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या वाहनांमुळे दिवसभर मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा जवळपास दोन ते तीन किमी अंतरांपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हीच स्थिती भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर होती. सहारा पुलासमोरील डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्यांखाली चिंब भिजण्याचा आनंद घेण्याकरिता आबालवृद्ध दंग झाले होते. लोणावळा परिसरातील सहारा पूल धबधबा, भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर्स लीप, शिवलिंग पॉइंट, गिधाड तलाव, खंडाळ्यातील राजमाची गार्डन, काचळदरी धबधबा, सनसेट पॉइंट ही सर्व ठिकाणे पर्यटकांनी गजबजली होती. यासह कार्ला व भाजे लेणी परिसरात पर्यटकांनी गर्दी केल्याने दीड ते दोन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोहगड किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी होती. पवना धरणाचा परिसरदेखील पर्यटकांनी भरून गेला होता. सलग सुट्यांमुळे अनेक पर्यटक लोणावळा परिसरात मुक्कामी आल्याने हॉटेल व लॉज फुल्ल झाले आहेत. चहा, वडापावच्या टपऱ्यांसोबत लंच होम व रेस्टॉरंटही हाऊसफुल होते.
वर्षाविहारासाठी पर्यटकांची गर्दी
By admin | Published: June 26, 2017 3:54 AM