राज्यभरात आणि आंबेगाव तालुक्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने निर्बंध कडक करण्यात आले आहे. लग्न सोहळ्यासाठी ५० लोकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र काही कार्यमालक आदेशाचे उलंघन करुन लग्नाला नियमापेक्षा जास्त गर्दी जमवत आहे. नियम मोडणाऱ्या कार्यमालकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पारगाव येथील वाडावस्तीवर अनिल ढोबळे यांनी शेतात मांडव घालून मुलीच्या लग्नासाठी ५० पेक्षा जास्त लोक जमवल्याचे निर्दशनास आले.तसेच येथीलच तनिष्का मंगल कार्यालयात शिंगवे येथील सुधीर वाव्हळ यांच्या मुलीच्या लग्नात ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी उपस्थित होते. त्यामुळे या दोन्ही कार्यमालकांकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड वसूल करुन कडक समज देण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, सहायक फौजदार चंद्रकांत वाघ, राजेश नलावडे, विनोद गायकवाड यांच्या पथकाने लग्नसोहळ्याची अधिकृत परवानगी घेतलेल्या मंगल कार्यालयांना अचानक भेट देऊन पाहणी करून ही कडक कारवाई केली आहे. यापुढे नियम मोडणारावर कडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी दिली.
लग्न सोहळ्यात गर्दी, दोन्ही कार्यमालकांकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड वसुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:10 AM