पवनानगर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील ऐतिहासिक किल्ले लोहगड या ठिकाणी शनिवार व रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. गेल्या आठवड्यात परिसरात पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात सगळीकडे राज्य व परराज्यातून अनेक पर्यटक येत आहेत. त्याचबरोबर रविवारी (२ जुलै) लोहगड, विसापूर या ऐतिहासिक किल्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सुदैवाने यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
सध्या लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी २५ रुपये तिकिट घेतले जात आहे. त्यामुळे सकाळी लोहगड किल्यावर गेलेले पर्यटक व दोन ते तीनच्या सुमारास खालून जाणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. लोहगड किल्ल्याच्या गणेश दरवाजातून शेकडो पर्यटक खाली जात तर तेवढेच वर गडावर येत असल्याने मोठी कोंडी झाली. यामुळे सुमारे चार तास मोठी गर्दी झाली होती. यामध्ये अनेक पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
आम्ही लोहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी सकाळी आलो होतो. पंरतु या ठिकाणी मुख्य दरवाजापासून तिकीट घेतल्याशिवाय वरती सोडले जात नव्हते. यामुळे खाली येणाऱ्या व वरती जाणारे पर्यटक मधेच अडकले होते. याचा अनेक पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला. गडरक्षक हे फक्त तिकिट घेण्यामध्ये मग्न होते.
- सनी कडूसकर, पर्यटक