चाकण : खेड तालुक्यातील सर्वच प्रमुख प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पुण्यासह मुंबई व जवळच्या जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लस घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, लस उपलब्धच नसल्याने नागरिकांना लसीपासून वंचित राहावे लागत आहे.
खेड तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू आहे. रोज फक्त १०० व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ज्यांनी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केली आहे, त्यांना लसीकरण करण्याचा मेसेज आला आहे. जवळच्या लसीकरण केंद्रांवर करण्यात येणार आहे, असे तालुका आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, ऑनलाईन नोंदणीमध्ये खेड तालुक्याबाहेरील लोकांनी तत्परता दाखवल्याने आणि त्यांनी जिल्ह्यातील उपलब्ध केंद्र दाखवल्याने तेच लोक लसीकरणासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.
खेड तालुक्यातील चाकण, राजगुरूनगर, करंजविहिरे, पाईट या लसीकरण केंद्रांवर पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबईसह इतर भागातील नागरिक ऑनलाइन लसीकरण करण्यासाठी तालुक्यातील केंद्राची निवड करीत असून, लस घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. मात्र, खेड तालुका कोरोनाचे व्हॉटस्पॉट आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार मुंबई, पुणेसह इतरत्र पसरण्याची दाट शक्यता आहे.
चाकण परिसरात बाहेरगावच्या व्यक्तींना लसीकरण करण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी, अशी मागणी कैलास गाळव, किशोर जगनाडे, जितेंद्र घाटकर, अमित पाचोरे, योगेश डोंगरे, संतोष परदेशी, विजय जगनाडे आदींनी केली आहे.
अशिक्षित नागरिकांनी काय करायचे?
शासकीय संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर मोबाईलवर मेसेज आल्यावरच लसीकरण केले जात आहे. मात्र, अशिक्षित लोकांनी कसे नोंदणी करायची? एक तर संकेतस्थळ नेहमीच बंद झालेले दाखवत आहे.
स्थानिकांना पिन कोड नंबर व आधार कार्ड नोंदणी करून लस द्यावी, अशी मागणी तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. - किशोर जगनाडे, सामाजिक कार्यकर्ते
चाकण ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे, ठाणे, मुंबई आदी ठिकाणचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर स्थानिक नागरिक फक्त दोनच होते. लसीची नोंदणी व शेड्युल नियमावलीत बदल करणे गरजेचे आहे. यासाठी खासदार, आमदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. सर्वसामान्य जनतेला कोणीही वाली राहिला नाही. - राजेंद्र शिंदे, सचिव, दुर्गाई हृदय प्रतिष्ठान
--------------------------------------------------------
फोटो - चाकण ग्रामीण रुग्णालयात लसीकरण साठी झालेली गर्दी.