पुणे : राज्यातील चाैथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल राेजी पार पडत आहे. यात पुण्यातील मावळ आणि शिरुर या लाेकसभेच्या जागांचा समावेश आहे. दाेन वर्षापूर्वी काेरेगाव भिमा येथे 1 जानेवारी राेजी हिंसाचार झाला हाेता. काेरेगाव भिमा हे शिरुर मतदार संघामध्ये येते. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कुठलिही अनुचित घटना घडू नये यासाठी सीआरपीएफचा बंदाेबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबराेबर काेरेगाव भिमा येथील मतदान केंद्र हे संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घाेषित करण्यात आले असून त्याचे वेब कास्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी दिली.
1 जानेवारी 2017 राेजी काेरेगाव भिमा येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास आलेल्या दलित बांधवांवर हल्ला करण्यात आला हाेता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे पडसात राज्यात उमटले हाेते. त्यामुळे या ठिकाणी काेणताही अनुचित प्रकार घडू नये साठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. काेरेगाव भिमा येथील मतदान केंद्र हे संवेदनशील मतदान केंद्रामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या ठिकाणचे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. तसेच येथील मतदान केंद्रावर सीआरपीएफचे जवान देखील तैनात करण्यात येणार आहेत.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने निवडणूकीची सर्व तयारी पूर्ण केली असून येत्या रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ईव्हीएम मशीन सर्व मतदान केंद्रावर पोहचविले जाणार आहेत.