पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेने मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाच्या कुटुंबीयांना एक कोटी १५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी दिले.
दुचाकीस्वार तरुण ७ मे २०१९ रोजी बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्याने निघाला होता. त्यावेळी भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ताे खासगी रुग्णालयात तंत्रज्ञ होता. त्याला दरमहा ३७ हजार पगार मिळत होता, तसेच तो एका खासगी रुग्णालयातील क्ष-किरण विभागात अर्धवेळ काम करत होता. तेथे त्याला दरमहा १२ हजार रुपये पगार मिळत होता. या ३५ वर्षीय तरुणाच्या पगारावर त्याचे कुटुंब अवलंबून होते.
तरुणाची पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांनी ॲड. अनिल पटणी आणि ॲड. आशिष पटणी यांच्यामार्फत नुकसानभरपाई मिळवण्यासाठी जिल्हा न्यायाधीश डोरले यांच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. डंंपर मालक आणि त्याची विमा कंपनी एस. बी. आय. जनरल इन्शुरन्सविरुद्ध हा दावा केला होता. या दाव्यात दाखल कागदपत्रे, तसेच साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ८७ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच दावा दाखल झाल्यापासून दरमहा ८ टक्के व्याजदर असे एकूण एक कोटी १५ लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. विमा कंपनीच्या वतीने ॲड. बाठिया यांनी काम पाहिले.