आंबेठाण : पिंपरी बुद्रुक (ता. खेड) येथील लादवड येथे असणाऱ्या स्टोन क्रशरमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील दगड खाणीत केल्या जात असलेल्या ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे तर जवळपासच्या विहिरी कोसळत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. हे स्टोन क्रशर आणि खाण बंद केली नाही तर त्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स या संस्थेच्या माध्यमातून विवेक भुजबळ यांनी दिला आहे.याबाबत वेळोवेळी प्रांताधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. खेडच्या तहसीलदारांनी या महिन्यातील ६ तारखेला पत्रक काढून लादवड येथील एक आणि जऊळके येथील दोन खाणींना सील लावण्यात येईल, असे सांगितले असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे. परंतु आजपर्यंत याबाबत कुठलीही कारवाई झाली नसून खेडचा महसूल विभाग याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील युवकांनी केला आहे.या ठिकाणी नागरिकांचे जनजीवन धोक्यात येत आहे, हे निदर्शनास आणून दिल्यानंतर तहसीलदारांनी खाणमालक, नागरिक आणि संबंधित प्रशासन यांची एकत्रित बैठक घेऊन यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. तहसीलदारांनी सूचना करूनही या ठिकाणी ब्लास्टिंग सुरू असून, या ठिकाणाहून उडत असणाऱ्या धुळीमुळे परिसरात राहणारे नागरिक आणि रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी यांचे जीवनच धोक्यात आले आहे. तसेच येथे उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील पिकांवरही परिणाम झाला आहे. येथे केल्या जात असणाऱ्या ब्लास्टिंगमुळे परिसरातील विहिरी आणि येथे असणाऱ्या घरांना तडे गेले आहेत. येथील खाण आणि क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे यामुळे पिके जळण्याच्या मार्गावर असून, यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना धुळीमुळे श्वसनाचे विकार जडत असून, त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल करून दाद मागण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांची कोणी दखल घेतली नाही. म्हणून अखेर सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स या संस्थेच्या माध्यमातून लढा उभारण्याचे ठरविले असून आगामी आठ दिवसांत या दगडखाणी तहसीलदारांनी कायमस्वरूपी सील कराव्यात आणि नागरिकांच्या जीविताशी होत असलेला खेळ थांबवावा. असे झाले नाही तर स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयात दाद मागण्यात येईल, असाही इशारा विवेक भुजबळ यांनी दिला आहे. (वार्ताहर)
क्रशरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: April 24, 2017 4:29 AM