पुणे : क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. १५) देवराम बारस्कर (वय ६८, रा. सहकारनगर) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २४ सप्टेंबर २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला. बारस्कर यांना इव्हॉन साराह आणि बाबू बोर्डोलोई यांचा फोन आला. क्रिप्टो करन्सीत बिटकॉइन ट्रेडिंग करून चांगला मोबदला मिळेल. यामध्ये गुंतवणूक केल्यास प्रचंड पैसे आहे, असे सांगून तक्रारदार यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले.
त्यानंतर बनावट वेबसाईटच्या आधारे खोटा नफा मिळत असल्याचे भासवून तक्रारदार यांना एकूण २४ लाख ८५ हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले. मात्र, प्रत्यक्षात ते पैसे विड्रॉल केले असता त्यामध्ये अडचणी येत होत्या, त्यामुळे तक्रारदार यांनी विचारणा केली. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक देशमाने हे करीत आहेत.