पुणे : अधिकाधिक गरीब रुग्णांना दूर्धर आजारावर मोफत उपचार मिळावेत; या उद्देशाने धर्मादाय कार्यालयाने पुढाकार घेतला असून मराठा चेंबरच्या सहकार्याने सर्व औद्योगिक कंपन्यांकडून ‘सीएसआर फंड’ मिळवण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात भेटण्यासाठी येणा-या नातेवाईकांकडूनही नाममात्र शुल्क आकारण्याचा प्रस्ताव असून या शुल्कातून मिळालेल्या रक्कमेचा उपयोग केवळ गरीब रुग्णांच्या उपचारासाठीच करण्यात येणार आहे.परंतु,रुग्णालयांना नातेवाईकांना शुल्क बंधनकारक करता येणार नाही.
धर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांसाठी ठरावीक रक्कम खर्च करणे अपेक्षित आहे.मात्र,अनेक गरीब रुग्णांना केवळ पैसे नसल्यामुळे उपचार मिळत नाही.परिणामी उपचाराआभावी त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे धर्मादाय कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमधील अधिकाधिक गरीब रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.औद्योगिक कंपन्यांकडून दरवर्षी विविध सामाजिक कामांसाठी ‘सीएसआर फंड’ वितरित केला जातो. मात्र,याच कंपन्यांकडून गरीब रुग्णांसाठी 100 ते 200 कोटी रुपये निधी मिळाला तर अनेकांना मोफत उपचार मिळू शकतात.पुणे विभागीय सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख म्हणाले, मराठा चेंबरच्या सहकार्याने कंपन्यांकडून सीएसआर फंड मिळावा याबाबत बैठक घेतली जाणार आहे. त्यात कंपन्याकडून प्राप्त झालेल्या रक्कमेचा हिशोब दररोज धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून दिला जाईल.त्याचप्रमाणे कंपन्यांनी रुग्णालयांना मदत केल्यास किती व कोणत्या रुग्णालयांचा जीव वाचू शकतो; याबाबतचे सादरीकरण केलेजाणार आहे.भेटण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून निधी मिळाल्यास गरीब रुग्णांसाठी थोडा आधार मिळू शकतो.रुग्णांना भेटण्यासाठी येणा-या नातेवाईकांकडून सक्तीने शुल्क आकारू नये,अशा सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.पुणे शहरातील वाहतुक कोंडीच्या समस्येमुळे काही वेळा रुग्णांना रुग्णालयात घेवून जाण्यास उशीर होतो.त्यातच रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे शहरातील सर्व रुग्णालयांना बाईक अॅमब्युल्स ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या अॅमब्युल्सच्या सहाय्याने वाहतुक कोंडीतून मार्ग काढून रुग्णांना रुग्णालयापर्यंत घेवून जाणे सोपे होईल.तसेच या अमब्युल्ससाठी फारसा खर्चही येणार नाही. -दिलीप देशमुख, सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग