पुणे : देशातील केंद्रीय, राज्य विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी आयाेजित सीयुईटी पीजी- २०२४ प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा १५७ विषयांसाठी ५ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयाेगाने केंद्रीय, राज्य तसेच खाजगी, अभिमत विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था आणि स्वायत्त महाविद्यालयांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी काॅमन युनिव्हर्सिटी एन्ट्रस टेस्टचे सीयुईटी पीजी प्रवेश परीक्षा बंधनकारक केली आहे. सीयुईटी पीजी चे २०२२ पासून सुरूवात झाली. पहिल्या वर्षी २०२२ मध्ये ३ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली. त्यानंतर २०२३ मध्ये ५ लाख ४० हजार तर २०२४ मध्ये ७ लाख ६८ हजार ४१४ जणांनी नाेंदणी केली त्यातील ७५ टक्के म्हणजेच ५ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश परीक्षा दिली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएच्या वतीने दि. ११ ते २८ मार्च या कालावधीत भारतासह परदेशातील मनामा, दुबई, काठमांडू, मस्कट, रियाध, ओट्टावा, अबुधाबी, व्हिएन्ना आणि कतार आशा एकुण २६२ शहरातील ५७२ सेंटर्सवर ऑनलाईन माध्यमातून सीयुईटी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते. केंद्रीय, राज्य, खाजगी आणि इतर विद्यापीठे असे एकुण १९० विद्यापीठांनी सीयुईटी- २०२४ अंतर्गत प्रवेशासाठी नाेंदणी केली आहे.