सोमेश्वरनगर : चालू साखर हंगामात राज्यातील सुरू असलेल्या १७७ साखर कारखान्यांपैकी १७५ कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव विघ्नहर कारखाना अद्याप सुरू आहे. हा कारखानादेखील येत्या दोन-तीन दिवसांत बंद होणार आहे. या सर्व कारखान्यांनी मिळून ७४२ लाख टन उसाचे गाळप केले, तर ८४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २१ लाख टनाने साखरेचे उत्पादन घटले आहे. एक महिन्यापूर्वी राज्यातील १३२ कारखाने बंद झाले होते, तर ४५ साखर कारखाने सुरूच होते. त्यांच्या पुढे २५ लाख टन ऊस गाळप करण्याचे आव्हान होते. जवळपास ३० हजार हेक्टरच्या आसपास ऊस शेतातच उभा आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप केले. चालू गळीत हंगामात आॅक्टोबर महिन्यात साखर कारखानदारी सुरू होण्याच्या सुरुवातीलाच राज्यातील ऊसतोड व वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला होता. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या साखर कारखानदारीला नोव्हेंबर महिना उजाडला. कारखानदारी सुरळीत चालू होण्यासाठी १५ नोव्हेंबर उजाडले. वास्तविक यावर्षी राज्यातील उसाचे जादा क्षेत्र पाहता, आॅक्टोबर महिन्यातच साखर कारखानदारी सुरू होणे अपेक्षित असताना एक ते दीड महिना कारखाने सुरू होण्यासाठी उशीर झाला. हेच कारखाने आॅक्टोबर महिन्यात सुरू होणे गरजेचे होते. वेळेत कारखाने सुरू झाल्यानंतर गळीत हंगाम एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाला असता. सध्या राज्यातील आता १७७ साखर कारखान्यांपैकी पुणे जिल्ह्यातील विघ्नहर कारखाना वगळता १७५ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. विघ्नहर कारखानादेखील येत्या दोन- तीन दिवसांत बंद होत आहे. दुसरीकडे चालू हंगामात राज्यातील शेतीच्या पाण्याची परिस्थीती अत्यंत गंभीर आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळून चालला होता. उसाचे टनेज घटत होते. त्यामुळे ऊस उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. २५० लाख टनाने उसाचे क्षेत्र घटणार जिल्ह्यामध्ये विघ्नहर कारखान्याकडे सर्वांत जादा ऊस शिल्लक होता. तो कारखाना अजूनही सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्याचा साखर हंगाम एकदाचा संपला असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता पुढील हंगामासाठी राज्यातील साखर कारखान्यांपुढे अंदाजे ५०० लाख टनांच्या आसपास उसाचे गाळप आहे. चालू वर्षीच्या तुलनेत जवळपास २५० लाख टनाने उसाचे क्षेत्र घटणार आहे. अजून उन्हाळ्याचा दीड महिना बाकी असून, यामध्येही काही प्रमाणात उसाच्या क्षेत्रात घट येण्याची चिन्हे आहेत. साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी एवढाच म्हणजे ११.३० टक्केचा साखर उतारा ठेवण्यामध्ये यश मिळविले. कारखाना अजून दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे. चालू हंगामात १० लाख ६६ हजार टन उसाचे गाळप केले असून, कारखान्याकडे जवळपास २५ हजार एकरांवरील ऊस उपलब्ध होता. पुढील हंगामातही कारखाना ८ लाख टनाच्या आसपास गाळप करणार आहे. - सत्यशील शेरकर (अध्यक्ष, विघ्नहर कारखाना)
१७५ कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता
By admin | Published: May 08, 2016 3:22 AM