दौंड : भीमा सहकारी साखर कारखान्याची चौकशी झाल्यावर या कारखान्यात जो दोषी असेल त्याची येणारी दिवाळी तुरुंगात असेल. यासाठी मी स्वतः चौकशीची कायदेशीर तक्रार ईडी आणि संबंधित सहकार खात्याकडे करणार असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा भीमा पाटस साखर कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
भीमा पाटसचे अध्यक्ष तथा भाजपाचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात हे दोघेही कारखान्याच्या चौकशीची भाषा करतात. मात्र, दोघेही वास्तवात काहीच करीत नसल्याने कारखान्याचा सभासद या नात्याने कारखान्याच्या चौकशीसाठी मी पुढाकार घेणार आहे. राजकीय जोडे बाहेर ठेवून तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ताकवणे यांनी केले. भीमा पाटस कारखाना सुरू होणे ही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हा कारखाना आर्थिक डबघाईला आणला कोणी याची चौकशी झाली तर सत्य पुढे येईल. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव शितोळे यांनी कारखाना कर्जमुक्त केला होता. मग सध्याच्या परिस्थितीत कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा डोंगर कोणी उभा केला? स्वतःचे कर्तृत्व झाकण्यासाठी सहकारमहर्षी मधुकरराव शितोळे यांच्या कारकिर्दीतील चौकशीची मागणी योग्य नाही. मधुकाका यांच्या संचालक मंडळात माजी आमदार राजारामबापू ताकवणे, माजी आमदार बाळासाहेब जगदाळे, माजी पंचायत समितीचे सभापती नानासाहेब पवार यांच्यासह चारित्र्यसंपन्न मंडळी होती. हे शेतकरी विसरणार नाही. माजी मंत्री शालिनी पाटील यांच्या मागणीनुसार जरांडेश्वर साखर कारखान्याची चौकशी होती. मग भीमा पाटसची चौकशी का होत नाही? याचे मुख्य कारण म्हणजे राहुल कुल आणि रमेश थोरात हे राजकीय सोयीनुसार चौकशीची मागणी करतात. त्यामुळे कारखान्याची चौकशी होत नाही, असे ताकवणे म्हणाले.
फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना नामदेव ताकवणे.