लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या अनेक वर्षात पुण्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘कोंबिंग ऑपरेशन’ करण्यात आले. त्यासाठी मोठा फौजफाटा पोलिसांनी कामाला लावला होता. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये चांगलीच जरब बसल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांची ही कारवाई यापुढेही चालू राहणार असल्याचे सांगण्यात आल्याने गुन्हेगारांवरचा दबाव वाढला आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले, “गुन्हेगारीच्या उच्चाटनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ‘क्राईम रेकॉर्ड’ अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सर्वेलन्स अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. या रेकॉर्डच्या आधारे गेल्या ५ वर्षातील तडीपार केलेल्या गुन्हेगारांची तपासणी या कारवाईत करण्यात आली. कारवाई यापुढेही चालूच राहिल.”
विविध टोळ्यांमधील ‘रेकॉर्ड’वर असलेल्या ३२८ गुन्हेगारांची खंडणी विरोधी पथकाकडून तपासणी करण्यात आली. वाहन चोरी व दरोडा प्रतिबंधक विभागाने वाहनचोरीतील ४९ आरोपींची तपासणी केली. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत भारती विद्यापीठ परिसरात गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक झाली. कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून तीन महिलांची सुटका केली.
शहराच्या उपनगरांमध्ये किरकोळी गुन्हेगारी फोफावू लागली आहे. रस्त्यावरील गुंडगिरी, वाहनांची तोडफोड यासारख्या प्रकारांमुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये जरब बसू लागली आहे. पोलिसांच्या कारवाईत सातत्या राहावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.