पुणे : नोटाबंदीच्या निर्णयामुळे नाट्य व्यवस्थापकही कात्रीत सापडले आहेत. नाट्यगृहाचे भाडे भरण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा राज्य सरकारने दिली असूनही महापालिकेच्या नाट्यगृह व्यवस्थापकांकडून आडमुठेपणाची भूमिका घेतली जात आहे. भाड्याची रक्कम चेक अथवा डिमांड ड्राफ्टने भरण्याचा तगादा लावल्याने नाट्य व्यवस्थापकांची अडचण झाली आहे.५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाव्यात, अशी परवानगी तावडे यांच्याकडून देण्यात आली. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीतील नाट्यगृहांसाठी ही परवानगी देण्यात आली. मंगळवारी ही घोषणा होऊनही नाट्यगृह व्यवस्थापकांकडून अद्याप जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. नोटा स्वीकारण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी तोंडी सूचना केली होती.लावणी कार्यक्रमाचे निर्माते शशिकांत कोठावळे म्हणाले, ‘‘आम्ही कार्यक्रमासाठी प्रेक्षकांकडून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या. नाट्यगृहाचे भाडे भरण्यासाठी गेलो असता, या नोटा स्वीकारण्यास नाट्यगृह व्यवस्थापकांनी नकार दिला. जुन्या नोटा स्वीकारण्याचा अध्यादेश हाती पडल्याशिवाय, या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, अशी अडवणुकीची भूमिका त्यांनी घेतली आहे. एका कार्यक्रमासाठी नाट्यगृहाचे ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाडे भरावे लागते.’’समीर हंपी म्हणाले, ‘‘सरकारकडून नोटा स्वीकरण्याची मुभा मिळाल्यानंतर त्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. मात्र, नाट्यगृह व्यवस्थापकांकडून अध्यादेश जारी झाला नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. ही बाब मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाला कळवण्यात आली आहे.’’ (प्रतिनिधी)
सांस्कृतिकमंत्र्यांची परवानगी धुडकावली
By admin | Published: November 18, 2016 6:17 AM