नम्रता फडणीस पुणे : जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिसांमध्ये देखील अंगभूत कलागुण असतात. कुणी चांगले चित्र, कुणी सुंदर शिल्प काढतो तर कुणी उत्तम छायाचित्रकार असतो. याव्यतिरिक्तही अनेक कलाकौशल्य त्यांच्यात दडलेली असतात. मात्र स्वत: मधील ही कलात्मकता समाजासमोर आणण्याची फारशी संधीच त्यांना मिळत नाही. त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याच्या उददेशाने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यात ' कल्चरल सेंटर' ची निर्मिती केली जाणार आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या बाजूस असलेल्या जागेत हे सेंटर उभारले जाणार असून, त्यासंबंधीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खास पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी निर्माण केले जाणारे असे हे राज्यातील पहिलेच सेंटर ठरणार आहे. ' पोलीस ' म्हटले की चोवीस तास ऑनडयुटी. मात्र सामाजिक सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या या जनतेच्या शिलेदारांमध्येही अनेक कला दडलेल्या असतात. त्यांच्यातही अनेक चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार सुप्तपणे वावरत असतात. आपलं अवघं आयुष्य पोलीस सेवेला समर्पित करूनही आपल्यातील कला जिवंत ठेवण्याचा ते कसोशीने प्रयत्न करतात. परंतु त्यांना आपल्यातील कलागुणांना वाव देण्याची फारशी संधी मिळत नाही आणि व्यासपीठही उपलब्ध होत नाही. याकरिताच स्वत:मधील कलाकौशल्य दाखविण्याची संधी त्यांना मिळावी हा या सेंटरच्या स्थापनेमागील हेतू असल्याची माहिती पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. के.व्यंकटेशम म्हणाले, शिवाजीनगर पोलीस स्टेशन बाजूस असलेल्या जागेत हे सेंटर उभे केले जाणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वत:च्या कलाकृती दाखविण्याची संधी मिळणार आहे. या कल्चरल सेंटरमध्ये छोटीशी आर्ट गँलरी, कलादालन, छोट्याशा कार्यक्रमांसाठी जागा यांचा समावेश असणार आहे. या सेंटरच्या उभारणीसाठी दीड कोटी रूपयांचा निधी उपलब्ध आहे. ही जागा पुणेपोलिसांच्याच ताब्यात असल्याने सेंटरसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या आठ ते नऊ महिन्यांमध्ये हे सेंटर उभे राहील.
पुण्यात पोलिसांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ' कल्चरल सेंटर' उभारले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 7:00 AM
आपलं अवघं आयुष्य पोलीस सेवेला समर्पित करूनही आपल्यातील कला जिवंत ठेवण्याचा ते कसोशीने प्रयत्न करतात...
ठळक मुद्देराज्यात अशाप्रकारचे हे पहिलेच सेंटर ठरणारशिवाजीनगर पोलीस स्टेशन बाजूस असलेल्या जागेत हे सेंटर उभे केले जाणार पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वत:च्या कलाकृती दाखविण्याची संधी मिळणार