पुणे : पुण्यात कोरोनाने प्रवेश केल्याचा धसका सांस्कृतिक विश्वानेदेखील घेतला आहे. काही संयोजकांनी आपले नियोजित कार्यक्रम पुढे ढकलले असून, देशाबाहेर होणारे नाटकांचे दौरेदेखील रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांकडेदेखील पुणेकर पाठ फिरवू लागले आहेत.पुणे ही सांस्कृतिक राजधानी मानली जात असल्याने दररोज शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र, पुण्यात कोरोनाचे आठ पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्हा प्रशासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होत असल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून शक्यतो जाहीर कार्यक्रम घेणे टाळावे, असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, आयोजकांनीही आपले नियोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. येत्या १२ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण पुरस्कार वितरण समारंभ आणि कविसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, ‘कोरानाच्या पुण्यावरील प्रेमा’मुळे यशवतंराव चव्हाण पुरस्कार वितरण समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील तारीख नंतर कळविण्यात येईल, असे ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, संजय ढेरे आणि सचिन जाधव यांनी सांगितले.
नाटकांच्या तिकीटविक्रीवर विपरीत परिणाम 1 नाट्यनिर्मात्यांनी अद्यापही प्रयोग लावणे बंद केलेले नसले, तरी नाटकांच्या तिकीटविक्रीवर त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला आहे. नाटकांकडेही रसिक फिरकत नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाºयांकडून लेखी आदेश आल्यास कार्यक्रम रद्द करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. २ नाटकांच्या देशाबाहेरील दौºयांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा प्रयोग अमेरिकेमध्ये होणार होता. मात्र, हा प्रयोग रद्द करण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेनेही कोरोनाच्या सावटामुळे परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तसेच, मसापतर्फे सातारा येथे दि. १५ मार्च रोजी होणारे युवा साहित्य नाट्य संमेलनही तूर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. तरीही, शहरातील काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र, पुणेकरांनी कोरोनाची धास्ती घेतल्यामुळे कार्यक्रमांना रसिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे..........