चिंचवड : मूल्याधिष्ठित समाज निर्माण करण्याचे प्रमुख आव्हान आपल्यासमोर आहे. संतांच्या विचारांचे आचरण करण्याची गरज आहे. संस्कारातूनच संस्कृतीचे रक्षण केले जाऊ शकते, असे मत शंकराचार्य विद्याभिनव शंकरभारती यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील श्रुतीसागर आश्रम पुणे आणि शिवशक्ती ज्ञानपीठाच्या वतीने आयोजित आद्य शंकराचार्य जयंती महोत्सवाच्या सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर स्वामी स्वरूपानंद सरस्वती, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, शिक्षणतज्ज्ञ मो. स. गोसावी, डॉ. बाबासाहेब तराणेकर, शिवकुमार विद्यानंद महास्वामी, डॉ. वंशीकृष्ण घनपाठी, स्वामी स्थितप्रज्ञानानंद सरस्वती आदी उपस्थित होते.या वेळी आदी शंकराचार्य पुरस्कार शिवकुमार विद्यानंद महास्वामी यांना, तर वेदसंवर्धन पुरस्कार डॉ. वंशीकृष्ण घनपाठी यांना प्रदान करण्यात आला. या वेळी शंकराचार्यांनी आद्य शंकराचार्यांचे अलौकिक कार्य, आजचा समाज, मानवी जीवन यांविषयी मार्गदर्शन केले. शिवकुमार विद्यानंद महास्वामी म्हणाले, ‘‘माणसे नुसतीच साक्षरा झाली आहेत. त्याचा उलट अर्थ घेतला, तर राक्षसा असा अर्थ होतो. या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. सामाजिक वर्तणूक, दायीत्व, समर्पित भावना जीवनात आवश्यक आहे. त्यातूनच जीवन आणि जगणे समृद्ध होणार आहे. पुण्यकर्माने, सद्गुणांनी जीवनात आनंद प्राप्त करता येतो.’’ डॉ. पाटील म्हणाले, ‘‘संत सहवास ही आनंदाची गोष्ट आहे. साधूसंत येती घरा, तोची दिवाळी, दसरा, अशी अवस्था आज आहे. संतांचे दर्शन झाल्याने आनंदतरंग उमटले आहेत. सत्त्वगुणांचे रक्षण झाले, तरच वैदिक धर्माचे रक्षण होणार आहे. संतांनी दिलेल्या मार्गावर आचरण केल्यास जीवनात आनंद प्राप्त करता येईल.’’ डी. वाय. पाटील विद्यापीठकडूनही सत्कार करण्यात आला. श्रीमद्भगवतगीता इंटरॅक्टिव्ह ध्वनिमुद्रिका आणि स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.(वार्ताहर)
संस्कारांतून संस्कृ ती टिकेल
By admin | Published: May 12, 2016 1:06 AM