लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहा ते सकाळी सहा या काळात संचारबंदी लागू करण्यात आली असून, पीएमपी बससेवाही आठ दिवसांकरिता बंद ठेवण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी (दि. ३) पीएमपीएमलच्या स्वारगेट येथील मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या निर्णयामुळे आर्थिक घडी पुन्हा विस्कटणार असल्याने संचारबंदी आणि पीएमपीबंदीचा आदेश पाळणार नसल्याचे यावेळी खासदार गिरीश बापट म्हणाले. तसेच रविवारपासून (दि. ४) शहराच्या सर्व भागात आंदोलन करणार असल्याचे भाजपातर्फे यावेळी सांगण्यात आले.
पीएमपी सुरू करून संचारबंदी मागे घ्या, या मागणीसाठी भाजपाने आंदोलन केले. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह काही नगरसेवक व कार्यकर्ते यात सहभागी झाले. यावेळी बापट म्हणाले, “शासनाने घेतलेल्या नागरिक हिताच्या निर्णयाचे समर्थन करतो. प्रशासनाने खासगी हॉस्पिटल ताब्यात घ्यावीत. कोविड आणि नॉन कोविड अशी वर्गवारी करावी. प्रशासनाकडून ‘रोग एक आणि निदान दुसरेच’ असा प्रकार सुरू आहे. पीएमपी आणि संचारबंदी हे नियम जाचक आहेत. शहराची रक्तवाहिनी असलेली पीएमपी बंद केल्याने आर्थिक घडी विस्कटणार आहे. जमावबंदीचा निर्णय मान्य आहे. पण संचारबंदी पाळणार नाही.”
मुळीक म्हणाले की, संध्याकाळी संचारबंदीनंतर कामगारांनी घरी कसे जायचे? का कार्यालयात मुक्काम करायचा? या अर्धवट टाळेबंदीचा फटका सर्वसामान्यांना बसणार असून भाजपा त्याचा निषेध करत आहे. ज्यांचे यात नुकसान होणार आहे, त्यांच्यासाठी शासनाने पॅकेज जाहीर करावे. जमावबंदीचा आदेश पाळू पण संचारबंदीचा आदेश आम्ही मोडणार.
चौकट
पोलिसांनी हात उचलू नये
“पोलिसांनी खबरदारीने वागावे. नागरिकांना काठीने मारहाण करू नये. सरकारच्या जमावबंदी आणि संचारबंदीच्या आदेशामुळे पोलिसांचे राज्य येईल. समाजात दहशत निर्माण होईल,” असे खासदार गिरीश बापट म्हणाले.
चौकट
मुख्यमंत्र्यांनी दिलेले आव्हान मान्य
“मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर उतरण्याचे दिलेले आव्हान आम्हाला मान्य आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून आम्ही नागरिकांना सर्व प्रकारची मदत रस्त्यावरच येऊनच केली आहे. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. घरात-बंगल्यात बसणारे कार्यकर्ते नाही. जनतेच्या हितासाठी आंदोलन करीत आहोत,” असे म्हणत खासदार बापट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले. ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधताना “विरोधकांनी जरुर रस्त्यावर उतरावे, पण लोकांच्या मदतीसाठी,” या आशयाचे वक्तव्य केले होते.