पुणे : जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याकरिता नागरिकांच्या संचार करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच अलीकडील काळात पुणे ग्रामीण जिल्ह्यात विविध मागण्याकरिता विविध पक्ष व संघटनाकडून दूध आंदोलने, इतर आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने इत्यादीचे आयोजन केले जात आहे. २३ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा आहे. वरील कारणास्तव पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यासंदर्भात नियम भंग केल्यास कारवाई करणार.
जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव अपेक्षित प्रमाणात कमी झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध ठिकाणी मिरवणूक काढणे, रस्त्यांवर किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी करणे, रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविणे यावर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी निर्बंध घातले आहेत.