पुणे : पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी खबरदारी म्ह्णून गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जमावबंदी (१४४ कलम) लागू करण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच १० ते १९ सप्टेंबर या कालावधीसाठी हा आदेश लागू करण्यात आला असून उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पुणे शहर पोलिस सहायुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. त्याबरोबरच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून शहर पोलीस दलाकडून ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पोलिस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यास तसंच संचार करण्यास मनाई असे आदेश लागू केले आहेत. पुढचे दहा दिवस हे आदेश लागू राहणार असून याचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे.
शहर पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आचारसंहिता तयार केली आहे. बंदोबस्तावरील पोलिसांकडून या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उत्सवासाठी नागरिक बाहेर पडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे यंदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत. गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे ७ हजार पोलिस कर्मचारी, ७०० अधिकारी,शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक,छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियत्रण कक्ष राज्य राखीव पोलिस दलाच्या, तुकड्यांचा समावेश राहणार आहे.
गुन्हे शाखा व विशेष शाखेची पथके
शहरात गणेश उत्सवात गुन्हे घडू नये म्हणून गुन्हे शाखेचा वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक झोननुसार गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये १०० कर्मचारी राहणार आहेत. त्याबरोबरच घातपात विरोधी कारवाईसाठी विशेष शाखेचा ही बंदोबस्त राहणार आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. तसेच, वाहतूक पोलिसांकडून देखील बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
सीसीटीव्हीची नजर
पोलिसांकडून बंदोबस्ताच्या ठिकाणी मनुष्यबळ तैनात करण्यात आले असले तरी, महत्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर राहणार आहे. गर्दीची ठिकाणे, महत्वाची मंडळी यांची मंदिरे व मंडपात कॅमेरे लावण्यात येणार आहेत. ते सर्व चित्रिकरण थेट पोलिस ठाण्यात दिसेल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एका कर्मचार्याची नेमणूक केली जाणार असून, उत्सव कालावधीतील चित्रिकरण संग्रहीत ठेवले जाणार आहे.
''यंदा देखील उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. शहरातील गणेश मंडळांनी साध्यापद्धतीने उत्सव साजरा करण्यास करण्यास सहमती दर्शविली आहे. मंडळांनी आचरसंहितेचे पालन करून सर्वोतोपरी पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी देखील आपली एक सामाजिक जबाबदारी समजून स्वयंशिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करावे असंही त्यांनी सांगितलं आहे.''