पुणे : राज्यातील वाढत्या रुग्णासंख्येच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदी लागू करण्यात आल्यापासून ७ मेपर्यंत म्हणजेच ३९ दिवसांत तब्बल १ लाख ७६ हजार ८२६ रुग्ण आढळून आले आहेत. तर, १ लाख ६९ हजार ७५ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून रुग्णांचा आकडा तीन हजारांच्या खाली आला असून, काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील महिनाभराच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढली. मात्र, मार्च महिना सुरू होईपर्यंत ही वाढ तशी कमी होती. मात्र, मार्च आणि एप्रिल महिना पुणेकरांसाठी सर्वाधिक घातक ठरले. या काळात मोठ्या प्रमाणावर मृत्यूही झाले. राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी पुण्यातही सुरू झाली. मात्र, या काळातही गेल्या ३० दिवसांत आकडा कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. कधी सहा हजार, तर कधी चार हजार, कधी सात हजार तर कधी तीन हजार असा बधितांचा आलेख कमी-अधिक होत होता.
रुग्ण कमी होत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. परंतु, पालिका प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर हळूहळू रुग्ण वाढ कमी झाली आहे. या काळात पॉझिटिव्हिटी सुद्धा कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. अजून काही दिवस हा आकडा कमी होत गेल्यास दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असे स्पष्टपणे म्हणता येईल. मात्र, अद्याप या निष्कर्षाप्रत येण्यास प्रशासनही धजावत नाही.
-----
१) पॉईंटर्स
अ) ३१ मार्च ते १४ एप्रिल
टेस्टिंग - ३ लाख २४ हजार ८४
पॉझिटिव्ह - ७९ हजार १४४
रूग्णालयातून सुटी - ५७ हजार ९९२
पॉझिटिव्हिटी रेट - २४.५ टक्के
कोरोनामुक्तीचा दर - १७.८ टक्के
ब) १५ एप्रिल ते १ मे
टेस्टिंग - ३ लाख ५९ हजार ७८७
पॉझिटिव्ह - ७९ हजार ५६७
रूग्णालयातून सुटी - ८८ हजार ९२३
पॉझिटिव्हिटी रेट - २२ टक्के
कोरोनामुक्तीचा दर - २४.७ टक्के
क) २ मे ते ७ मे
टेस्टिंग - ९९ हजार ११९
पॉझिटिव्ह - १८ हजार ११५
रुग्णालयातून सुटी - २२ हजार १६०
पॉझिटिव्हिटी रेट - १८.३ टक्के
कोरोनामुक्तीचा दर - २२.४ टक्के
----
या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या घटण्यास झाली मदत
१. कडक निर्बंधांचा झाला फायदा
२. पोलिसांकडून जागोजागी कडक तपासणी
३. लसीकरणाचाही होतोय फायदा