लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे शहरामध्ये मंगळवार (दि.22) पासून रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संचारबंदी नसल्याने शहरातील नागरिक ख्रिसमस पार्टी व ३१ डिसेंबर रोजी नव वर्षाच्या पार्ट्या करण्यासाठी शहरा लगतच्या ग्रामीण भागात गर्दी करतील. यामुळे शहरी भागासोबतच परिस्थितीत नियंत्रणात असताना ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. याच पार्श्वभूमीवर 25 डिसेंबरपासून ग्रामीण भागात देखील संचारबंदी लागू करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी गुरूवारी राज्य शासनाला पाठविला आहे. शासनाने परवानगी दिल्यास शुक्रवार (दि.25) पासून ग्रामीण भागात देखील संचारबंदी लागू होईल.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारी म्हणून राज्यातील महापालिकांच्या क्षेत्रात मंगळवारपासून (दि. २२) रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या संचारबंदीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. परंतु संचारबंदीची प्रत्यक्ष आमलबंजावणी करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत ग्रामीण भागात देखील संचारबंदी लागू करण्यात येवी, असा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.