आळंदी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (रविवार) पासून (दि. ६) आळंदीसह चऱ्होली खुर्द, केळगाव, डुडूळगाव, चिंबळी, वडगाव -घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ, चऱ्होली बुद्रुक अशा दहा गावांत सोहळा समाप्तीपर्यंत अर्थातच १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.
आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकी वद्य अष्टमी ८ डिसेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होणार आहेत. एकादशी ११ डिसेंबरला, तर संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरला आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातून कार्तिकीवारीसाठी श्री पांडुरंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्या एसटीने वीस वारकऱ्यांसह ८ डिसेंबरला आळंदीत दाखल होतील. तत्पूर्वी ८ डिसेंबरला सकाळी ७ वाजता ३० जणांच्या उपस्थितीत गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने कार्तिकी सोहळ्याला प्रारंभ होईल. मंदिरातील कीर्तन, जागर आदी धार्मिक कार्यक्रम पंधरा वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होतील. परंपरेप्रमाणे माऊलींसमोर होणाऱ्या सेवांसाठी संबंधित पाचच व्यक्तींना आमंत्रित केले जाणार आहे. मंदिरातील नित्योपचार पूजा नियमांचे पालन करून संपन्न होणार आहेत. यात्रा कालावधीत आळंदीकडे येणारी खासगी तसेच सरकारी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर, शहरातील धर्मशाळेत वारीपूर्वी आणि वारीकाळात वारकरी आणि इतर मनुष्यास निवासास प्रतिबंध केला आहे.
चौकट :
आळंदी शहरात, तसेच माऊली मंदिराच्या प्रवेशद्वारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंदिराकडे येणाऱ्यामार्गावर, प्रदक्षिणा रस्ता, शहर प्रवेश करणारे रस्तेही बंद केले जाणार आहेत. पुण्याहून आळंदीकडे येणाऱ्या मॅक्झीन फाटा, डुडूळगाव, चिंबळी फाटा, चाकण रस्ता, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता प्रवासास पूर्ण बंद राहणार आहे.