पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव शहरातील विविध भागात वाढत असून त्यामुळे बुधवार सकाळपासून सिंहगड रोडवरील वडगाव धायरी व परिसरात कर्फ्यु लावण्यात आला आहे. सिंहगड रोडवरील नर्हे, हिंगणे, धायरी व आजू बाजूंच्या परिसरातील रस्ते बंद करण्यात येत आहेत. पोलीस लोकांना घरातून बाहेर पडू नका, असे स्पिकरवरुन आवाहन करीत आहे. पुण्यात आज ९ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. सिंहगड रोड परिसरातील अनेक भागात लोकांना होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी काही जण आता कोराना बाधित असल्याचे आढळून आले. तसेच या परिसरात लोक लॉक डाऊन केला असतानाही लोक तो पाळताना दिसत नाही. त्यामुळे या परिसरातही कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहगड रोडवर येणारे रस्ते, गल्ल्या, बॅरिकेट लावून बंद करण्यात येत आहेत. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी सांगितले की, या भागात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्यांपैकी काही जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सकाळपासून या भागात कर्फ्युची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. एक एक भाग बंद करण्यात येत आहे. लोकांना घरात थांबण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. याबरोबरच मंगळवार पेठेच्या आणखी काही भागात कोरोना बाधित रुग्ण सापडले. या अगोदरच मंगळवार पेठेच्या काही भागात कर्फ्यु लागू करण्यात आला होता. आता त्यात वाढ करण्यात येत आहे.
पुण्यात सिंहगड रोडवरील वडगाव, धायरी, नर्हे भागात कर्फ्यु ; लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 1:24 PM
सिंहगड रोडवरील नर्हे, हिंगणे, धायरी व आजू बाजूंच्या परिसरातील रस्ते बंद
ठळक मुद्देलोकांना घरात थांबण्याच्या सूचना