लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) या नवीन करप्रणालीची शनिवारपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र, या करप्रणालीमधील त्रुटी व कररचनेबाबत अद्यापही काही प्रमाणात संभ्रम, नाराजी कायम आहे. एकीकडे करप्रणाली स्वीकारण्यास तयार असलेल्या व्यावसायिकांनी करांमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे ग्राहकांवर पडणाऱ्या आर्थिक बोजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.देशातील सर्वप्रकारचे कर रद्द करून केंद्र सरकारने ‘जीएसटी’ ही नवीन करप्रणाली तयार केली आहे. मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेला ‘जीएसटी’ शनिवारपासून लागू होणार आहे. हा कर लागू होण्यापूर्वी विविध पातळ्यांवर बदल करण्यात आली. त्यातील त्रुटी, कर रचनेबाबत असलेली नाराजी यावरही विचारविनिमय करून सुधारणा करून तो अंतिम करण्यात आला. पण अद्यापही अनेक घटकांकडून जीएसटीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.इलेक्टॉनिक्स वस्तू, दुचाकींचे सुटे भाग, इलेक्ट्रिक साहित्य, नोंदणीकृत ट्रेडमार्क असलेल्या पॅकिंगमधील अन्नधान्य यांसह विविध वस्तुंवर वाढविण्यात आलेल्या करामुळे सर्वसामान्यांना फटका बसेल, असे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. ‘जीएसटी’चे स्वागत असले तरी त्यात अद्यापही काही त्रुटी आहेत. मात्र, केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जीएसटीला सामोरे जावेच लागणार असले तरी नाराजी कायम असेल, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.
जीएसटीबाबत उत्सुकता
By admin | Published: July 01, 2017 8:01 AM