कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतमध्ये गेल्या दोन-तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये सत्ता एका पॅनेलची येते. मात्र काही वर्षात सत्ता विरोधकांकडे देण्याची जणू परंपराच चालु झाली आहे. त्यामुळे कोरेगाव भीमाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरे पाहण्यास मिळाली होती. त्यातच यावर्षीच्या
ग्रामपंचायत निवडणुकीत गावकी भावकी जुळवीत तर विरोधी पॅनेलच्या विरोधात दुस-या वाॅर्डांमध्ये प्रचाराला न जाण्याच्या व हक्काची मते देण्याच्या अटीवर आठ जागा बिनविरोध काढण्यात यश आले होते. त्याचवेळी उर्वरित नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीतही दोन जागांना अडीच वर्षांनंतर राजीनामा देण्याच्या अटीवर तीन उमेदवारांनी पाठिंबा दिला होता. त्यात सतरा जागांमध्ये जय मल्हार पॅनेलला अकरा तर भैरवनाथ पॅनेलला सहा जागा मिळाल्या होत्या.
सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जय मल्हार पॅनेलचे अकरा सदस्य, त्यांचे
कुटुंब, मित्र परिवारासह सहा पॅनेलप्रमुखांनी गोवा-कोकणाची सफारी केल्याने सरपंच जय मल्हार पॅनेलचाच होणार, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र सरपंचपदाची निवडणूक लांबल्याने गोवा-कोकणात गेलेले सर्व परत गावात आले. दरम्यान जय मल्हार पॅनेलच्या पॅनेल प्रमुख व चार सदस्यांनी विरोधी भैरवनाथ पॅनलशी संधान बांधून सरपंचपदाचा फॉर्मुला ठरवित परत बाहेर फिरायला जाण्याचे ठरले. लव्हासाला लक्ष्मी दर्शनात जय मल्हार पॅनेल व भैरवनाथ पॅनेलच्या पॅनेलप्रमुखांमध्ये बैठकही पार पडली. मात्र कोठेतरी माशी शिंकली व सत्तेची बसलेली घडी विस्कटली. त्यामुळे उद्या होणा-या सरपंचपदाच्या निवडणुकीत कोणाचा सरपंच होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.