पुणे : शालेय शिक्षण विभागाने यंदा पहिल्यांदाच घेतलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीचा सोमवारी आॅनलाइन निकाल जाहीर झाला. कल जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी पहिल्या दोन तासांतच दीड लाखांवर हिट्स मिळाल्याने संकेतस्थळाचे सर्व्हर डाउन झाले. त्यामुळे पहिल्या दिवशी निकाल पाहता न आल्याने अनेकांची निराशाही झाली. पुढील काही दिवस संकेतस्थळ सुरूच राहणार आहे. येत्या दोन दिवसांत संकेतस्थळ संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर केल्या जावून सर्व विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे यांनी सांगितले. सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना हा निकाल ६६६.्र५ॅ२.ंू.्रल्ल या संकेतस्थळावर आॅनलाइन पाहता येणार होता. सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १ लाख ७४ हजार ४७५ विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाला भेट दिली. दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेबरोबरचा विद्यार्थ्यांना कल चाचणीचा निकालही देण्यात येणार आहे. मात्र, दुपारी १ ते २ वाजल्यादरम्यान जवळपास १ लाख विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर लॉग इन केले. त्यानंतर मिनिटाला २०० हिट्स मिळत होते. परिणामी काही ठिकाणी संकेतस्थळ हँग झाले तर काही ठिकाणी वेग मंदावला होता. राज्यातील १५ लाख ४७ हजार २५३ विद्यार्थ्यांचे निकाल संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याबाबत व्यवसाय मार्गदर्शन मुंबई येथील समुपदेशक दीपाली दिवेकर म्हणाल्या, की एकाच वेळी एक लाख मुले या संकेतस्थळाला भेट देतील अशी अपेक्षा नव्हती. निकालाच्या फाईल्सचा डेटा जास्त होता. प्रत्येक मुलाचा कल तसेच त्या क्षेत्राची माहिती या फाईल्समध्ये होती. त्याचबरोबर जर विद्यार्थ्यांचा दोन ठिकाणी कल आला असेल तर त्या प्रकारच्या दोन फाईल्स म्हणजे जवळपास पाच ते सहा पाने होती. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून या तांत्रिक अडचणी आल्या. परंतु या तांत्रिक अडचणी सोडविण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)
उत्सुकता; मात्र सर्व्हर डाउन
By admin | Published: April 26, 2016 1:08 AM