पुणे : देशात कायदे करताना ते धर्माच्या आधारावर नाही तर समानतेच्या आधारावर बनवावेत असे मत नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या सय्यदभाई यांनी व्यक्त केले.पद्मश्री जाहीर झाल्यावर त्यांनी लोकमत'शी बातचीत केली. यावेळी बोलताना त्यांनी देशात गाजणाऱ्या सीएए आणि एनआरसी'च्या मुद्द्यांवरही मत व्यक्त केले.
ते म्हणाले की, सध्याचे मुस्लिम मूळ भारतातले आहेत. ज्यांना बाहेर जायचे होते ते पूर्वीच फाळणीत देशाच्या बाहेर गेले. आता हे राहिलेत ते मूळ भारतीय आहेत त्यांना कोणत्याही स्थितीत वेगळे कायदे लागू होऊ नयेत असे मला वाटते. दरम्यान, सय्यदभाई हे पुण्याचे रहिवासी असून त्यांनी समाजसुधारक हमीद दलवाई यांच्यासोबत मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. त्याअंतर्गत त्यांनी मुस्लिम महिलांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा दिला.
देशात मागील वर्षी लागू झालेला ट्रीपला तलाक कायदा हे त्यांच्याच लढ्याचे फळ मानले जाते. वयाच्या 83व्या वर्षीही ते त्यांना आपले काम वाढवण्याची इच्छा आहे. व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास अख्तर सय्यद यांच्याशी त्यांचा 56 वर्षांपूर्वी निकाह झाला. अख्तर स्वतः पुरोगामी विचारांच्या पुरस्कर्त्या असून त्यांना तितकेसे शिक्षण मिळाले नाही. आणि म्हणूनच त्या सय्यदभाईंच्या मागे पहाडासारख्या उभ्या राहिल्या. या पुरस्कारात तिचा सिंहाचा वाटा असल्याचे सय्यदभाई सांगतात.
(बहिणीसाठी भाऊ पेटून उठतो तेव्हा...; पद्मश्री मिळालेल्या सय्यदभाईंच्या संघर्षाची कहाणी!)